गेल्या काही वर्षांपासून झेडटीईचे फोन भारतीय स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी कंपनीने नुबिया हा त्यांचा सब-ब्रॅण्ड भारतात आणला होता. परंतु, या फोनना भारतीय ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीने पुनरागमन केले असून, लक्षवेधी फोन भारतीय बाजारात उतरविले आहेत. यातील नुबिया झेड ११ फोनविषयी अधिक जाणून घेऊया –

अतिशय स्टायलिश असा हा फोन याच किंमतीतील अन्य फोनपेक्षा वेगळा ठरतो. बेझललेस डिझाइन हे या फोनचे खास वैशिष्ट्य आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी एस ७ एज प्रमाणे यात कर्व्हड स्क्रिन नसले, तरी हा फोन खऱ्या अर्थाने बेझललेस असल्याचे पाहताक्षणी जाणवते.
फोन हाताळताना काहीसा स्लिपरी जाणवला तरी, वरील आणि खालील बाजूस देण्यात आलेला सोनेरी रंगाचा बॅण्ड फोनला हातातून पडू न देण्यास उपयुक्त ठरतो. नुबियाने आपल्या लोगोतील लाल वर्तुळाचा फोनच्या होम बटणमध्ये चांगल्याप्रकारे वापर केला आहे. फोन चार्ज होत असताना हे होम बटण लाल रंगाच्या वर्तुळाने प्रकाशमान होते.

camera-sample-z11-a
Camera sample from Nubia Z11 (Image resized for web)

वैशिष्ट्ये

५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले (१०८० x १९२० पिक्सल), क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन ८२० प्रोसेसर, ६ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे २०० जीबीपर्यंत वाढविण्याची क्षमता, मागील बाजूस १६ मेगापिक्सलचा कॅमेरा, एफ/२, ओआयएस, ८ मेगापिक्सलपेक्षा अधिकचा पुढचा कॅमेरा, ३००० एमएएच बॅटरी, अॅण्ड्रॉइड ६.०, किंमत – २९,९९९ रुपये.

जमेची बाजू

याचे बेझललेस डिझाईन लक्षवेधी असे आहे. तुमच्या हातातील हा फोन पाहून, हा फोन कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी अनेकांची उत्सुकता वाढू शकते. या फोनमध्ये देण्यात आलेली जेश्चरदेखील वापरण्यास सोपी अशी आहेत. परफॉर्मन्सच्याबाबतदेखील हा फोन उच्चदर्जाचा ठरतो. बेंचमार्क स्कोअर चाचणीदरम्यान फोन वनप्लस ३ च्या तोडीचा तर झुक झेड२ पेक्षा श्रेष्ठ ठरला. मल्टीटास्किंग अथवा गेम खेळताना फोनच्या उत्तम परफॉर्मन्सचा अनुभव निश्चितच जाणवतो. अतिवापरानेदेखील फोन जास्त गरम होत नाही.

कॅमेरा हे या फोनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या फोनद्वारे जलदगतीने फोटो काढणे शक्य होते. त्याचबरोबर इमेजदेखील क्रिस्प असतात. यातील फास्ट ऑटोफोकस सब्जेक्टवर क्षणात लॉक होतो. अगदी अंधारातदेखील. याशिवाय कंपनीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली कॅमेऱ्याशी निगडीत अशी अॅप इन्टॉल करून अधिक फिचर्सचा वापर करू शकता.

द नुबिया यूआय ४.० समजण्यास आणि वापरण्यास सोपी आहे. यात अॅप ड्रॉवर देण्यात आला नसून सर्व अॅप्स होमस्क्रीनवरच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

त्रुटी

फोनची बॅटरी लवकर ड्रेन होते. फोनचा डिस्प्लेदेखील खूप ब्राइट आहे. डोळ्यांना व्यवस्थित दिसण्यासाठी ब्राइटनेस कमी करावा लागतो. बेझललेस डिझाइनमुळे हा फोन काळजीपूर्वक वापरणाऱ्यांसाठी आहे. अन्यथा फोनला इजा होण्याची शक्यता आहे.