23 July 2019

News Flash

फडणवीसांच्या काळात १२००० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शरद पवार यांचा आरोप; ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

शरद पवार यांचा आरोप; ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

ठाणे : देशातील उद्योगपतींना ८० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून हा आकडा भयावह आहे, असेही पवार या वेळी म्हणाले. ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशाच्या संरक्षण विभागातून राफेल खरेदीची कागदपत्रे चोरीला जात असतील तर हे सरकार देशाचे संरक्षण कसे करणार, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घोडबंदर येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांशी पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशभरातील शेतकऱ्यांसाठी ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. याच काळात गहू, तांदूळ, साखर निर्यातीत देश जगभरात तिसऱ्या क्रमांकावर होता. मागील पाच वर्षांत मात्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक केलेली नाही.

असत्यावर आधारित आश्वासने

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली होती. या घोषणेची अजूनही अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. तसेच समृद्धी महामार्गासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण होऊ शकलेली नाही. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीही अजून जमीन ताब्यात घेतलेली नाही, असे पवार यांनी सांगितले. सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाला आठ दिवसांत आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. साडेचार वर्षांचा काळ लोटला तरी त्यांना आरक्षण देऊ शकलेले नाहीत.

जागता पहारा ठेवा..

गोंदियामधील पोटनिवडणुकीत ७०० मतदान केंद्रावरील यंत्रे बंद होती. याबाबत तक्रार केल्यानंतर मतदान थांबवून यंत्र बदलण्यात आले. त्यामुळेच या ठिकाणी आमच्या उमेदवाराचा विजय झाला. बंद यंत्राकडे लक्ष दिले नसते तर आमचा पराभव झाला असता. नवी मुंबईत विकासकामे करणारे गणेश नाईक यांच्याबाबतीतही असेच काहीसे घडले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्रे तपासा आणि त्यावर बारीक लक्ष द्या, असे आवाहन शरद पवार यांनी केले. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघात गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या मागे संपूर्ण ताकद उभी केली जाईल.

First Published on March 14, 2019 2:22 am

Web Title: 12000 farmers suicides in maharashtra during fadnavis government sharad pawar