नियमांचे उल्लंघन केल्याने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त कारवाई; दीड लाखांचा दंड वसूल
रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागाने गेल्या आठवडाभर संयुक्तरीत्या विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालविणाऱ्या १२५ वाहन चालक, मालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. गेल्या आठवडाभरातील कारवाईत नियम तोडून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण, मुरबाड, उल्हासनगर परिसरात गेल्या आठवडय़ापासून वाहतूक सप्ताहानिमित्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहतूक विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अनेक वाहन चालक हेल्मेट घालत नाहीत. वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलतात. चारचाकी वाहन चालविताना पट्टा लावत नाहीत. रिक्षाचालक तीनऐवजी चार प्रवासी घेऊन प्रवास करतात. जीपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतात, असे प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या सगळ्या वाहन चालकांना अधिकाऱ्यांनी अडवून त्यांच्याकडून वाहतुकीचे नियम तोडल्याने, प्रवाशांची काळजी न घेता वाहतूक करीत असल्याने कारवाई करून दंड वसूल केला. वाहतुकीचे नियम तोडले तर परवाना निलंबित होतो, याची वाहन चालकांना जाणीव व्हावी म्हणून अशा दुचाकी, चारचाकी वाहन चालकांकडून दंड वसूल न करता, त्यांचे परवाने तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. अशा वाहन चालकांची गेल्या आठवडाभरातील संख्या १२५ आहे, असे नाईक यांनी सांगितले.

तीन महिन्यांसाठी निलंबित

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे- ९; रिक्षा, अवैध वाहतूक- २५; बस, जीप, प्रवासी वाहनातून माल वाहतूक करणे- २; वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलणे- ११ चालक; आसनपट्टा न लावणे- २८; हेल्मेट न घालणे- ६१. अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामधील काही चालकांकडून १ लाख ५० हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याच प्रकरणांमधील १२५ चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त राज्य परिवहन महामंडळांच्या चालकांशी संवाद साधला जात आहे. सुरक्षित वाहतूक म्हणून एस. टी.कडे बघितले जाते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक चालकाने दक्ष असले पाहिजे, असे सांगितले जाते. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, विद्यार्थ्यांनी स्वत:बरोबर इतरांना वाहतूक नियमाचे धडे द्यावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, परिवहन परिक्षेत्रात वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मुरबाडमध्येही कारवाई
मुरबाड येथे मंगळवारी वाहतूक सप्ताहनिमित्त वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी १९ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. या वाहन चालकांकडून ३० हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत हेल्मेट न वापरणाऱ्या ६ चालक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणाऱ्या ६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
-नंदकुमार नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण</p>