एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर पाणी

भाईंदर : महिन्यापासून मीरा-भाईंदर शहरात पेटलेल्या पाणी प्रश्नाला दूर  करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मीरा-भाईंदरला ‘एमआयडीसी’कडून १३५ दशलक्ष लिटर तर नवी मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठय़ातील २० दशलक्ष लिटर पाणी वळवण्यात येणार असल्याने एकूण १५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये महिन्याभरापासून गंभीर प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ‘एमआयडीसी’कडून होणाऱ्या पाणी पुरवठय़ात २५ दशलक्ष लिटर कपात करण्यात आल्याने ही कपात झाल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने राजकीय वादास सुरुवात झाली होती. त्यामुळे मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठय़ाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मंत्रालयात मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून बैठक आयोजित करण्यात आली होती.  ‘एमआयडीसी’कडून मीरा-भाईंदरला सध्या १०० दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. परंतु, प्रत्यक्षात १३५ एमएलडी पाण्याचे आरक्षण  जलसंपदा विभागाकडून आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या आणि गरज पाहता संपूर्ण मंजूर असलेले पाणी मीरा भाईंदरला देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नवी मुंबईचे २० दशलक्ष लिटर पाणी भाईंदरला

‘एमआयडीसी’कडून नवी मुंबई पालिकेला ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. परंतु, त्या पाण्याची नवी मुंबई पालिकेला गरज नाही, असे पत्र त्यांनी दिले आहे. तसेच नवी मुंबईचे स्वत:चे मोरबे धरण असल्याने त्यांच्या ‘एमआयडीसी‘ कोटय़ामधील २० एमएलडी पाणी मीरा भाईंदर शहरास देण्यात येणार असल्याचे  बैठकीत ठरल्याचे काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार  यांनी स्पष्ट केले.