इमारती स्वत:हून पाडण्याच्या घरमालकांना नोटिसा; महापालिका प्रशासनाने जबाबदारी ढकलली

ठाणे : पावसाळा तोंडावर आल्याने ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या महापालिकांनी शहरांमधील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली असून कल्याण डोंबिवली शहरात १६८ अतिधोकादायक इमारती असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेने शहरातील ८५ अतिधोकादायक इमारती पाडून टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेने मात्र ही जबाबदारी अंगावर घेणे तूर्तास टाळल्याचे दिसत आहे. कोणत्याही क्षणी पडू शकतील अशा या इमारती मालक अथवा भोगवटा धारकांनी स्वतहून पाडाव्यात, अशा स्वरूपाच्या नोटिसा महापालिका प्रशासनाने बजावल्या आहेत.

मुंब्रा, शीळ येथील लकी कंपाऊंड इमारत कोसळल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या राज्य सरकारने शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या सर्व इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी शहरांमधील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींची स्वतंत्र वर्गवारी करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. यानुसार ठाणे महापालिकेने दोन दिवसांपूर्वी ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागात चार हजार ७०५ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. तसेच ८५ इमारती अतिधोकादायक असल्याचे जाहीर केल्यानंतर या इमारती तातडीने पाडण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागास दिले.

दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेने यंदाच्या वर्षी पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १६८ अतिधोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. ही संख्या ठाणे महापालिका हद्दीपेक्षाही अधिक आहे. याशिवाय धोकादायक इमारतींचा आकडा २१० असून इतर शहरांच्या तुलनेत हा फारच कमी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी तातडीने इमारती रिकाम्या कराव्यात आणि मालक तसेच भोगवटाधारकांनी स्वखर्चाने त्या पाडून टाकाव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त गोंविद बोडके यांनी दिले आहेत. या इमारत मालकांची यादी महापालिकेने प्रसिद्ध केली आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार कल्याणमध्ये ५० धोकादायक, तर ११५ अतिधोकादायक आणि डोंबिवली १६० धोकादायक, तर ५३ अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारती रिकाम्या करण्यासाठी महापालिका लवकरच मोहीम हाती घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, इमारत पाडण्यासाठी रहिवाशांनाच आवाहन करण्यात आल्याने महापालिकेची मोहीम नेमकी कधी सुरू होईल, याविषयी एकंदर संभ्रमाचे वातावरण आहे. अतिधोकादायक इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी असेल, अशी भूमिका महापालिकेने इमारत मालकांना बजावलेल्या नोटिसांमध्ये घेतली आहे.