वाहतूक कोंडीत अडकल्याने कारचालकास अटक; तर तिघे चोरटे रोकड घेऊन पसार

ठाणे येथील कापुरबावडी भागात सोमवारी दुपारी कारमधून आलेल्या चार चोरटय़ांनी दोघा तरुणांना चाकू व पिस्तुलचा धाक दाखवून त्यांच्याकडील २५ लाख ८९ हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या चोरटय़ांचा माग काढत असताना ठाणे पोलिसांच्या हाती कारचालक लागला आहे. मात्र, त्याचे तीन साथीदार रोकड घेऊन पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मुंबईतील भांडुप परिसरात राहणारा रुपेश तावडे (२६) हा तरुण टेक्नोसॉफ्ट टेक्नॉलॉजिस कंपनीत काम करतो. व्यापाऱ्यांकडून रोख रक्कम घेऊन ती त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्याचे काम ही कंपनी करते. तसेच बँकेकडून पैसे घेऊन त्यांच्या विविध एटीएम सेंटरमध्येही पैसे भरण्याचे काम ही कंपनी करते. सोमवारी दुपारी रुपेश आणि त्याचा सहकारी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून व्यापाऱ्यांकडे जाऊन पैसे गोळा करीत होते. दरम्यान कापुरबावडी येथील एका मॉलमधील व्यापाऱ्याकडे पैसे घेऊन दोघेजण दुचाकीवरून परतत होते. त्यावेळी कारमधून आलेल्या चौघांपैकी तिघांनी त्यांना अडविले आणि चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील २५ लाख ८९ हजारांची रोकड लुटली.

तरूणांची आरडाओरड

या घटनेनंतर चौघांनी कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कापुरबावडीमधील वाहतूक कोंडीमध्ये त्यांची कार अडकली. त्याच वेळी गाडीचा पाठलाग करत असलेल्या दोघा तरुणांनी चोरचोर असा आरडाओरड केला. त्यामुळे भेदरलेल्या तिघा चोरटय़ांनी कारमधून उतरून रोकड घेऊन पळ काढला. असे असले तरी, या कारचा चालक राकेश साळुंखे याला मात्र पळता आले नाही. त्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.