ठाणे जिल्ह्यातील २९ केंद्रांवर लसीकरण मोहिमेला सुरुवात

ठाणे : सीरम इन्स्टिट्यूटनेउत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे ७४ हजार डोस ठाणे जिल्ह्याला दोन दिवसांपूर्वी मिळाले असून त्याचे जिल्ह्यातील महापालिका आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम राबविण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या असून आज, शनिवारपासून जिल्ह्यात सर्वच ठिकाणी करोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. एकूण २९ केंद्रांवर प्रत्येकी शंभर जणांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी २९०० जणांना पहिला डोस दिला जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण २९ लसीकरण केंद्र निश्चिात करण्यात आले आहेत. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रात ४, उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १, मिरा भाईंदर पालिका क्षेत्रात ४, भिवंडी-निजामपूर पालिका क्षेत्रात ४, नवी मुंबई पालिका क्षेत्रात ५, कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात ४, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात ७ केंद्रांचा समावेश आहे. या सर्वच ठिकाणी आज, शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून एका केंद्रामध्ये किमान १०० जणांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये ५ सदस्यांचा समावेश असणार आहे.

या सर्वच ठिकाणी वीज, इंटरनेटची सुविधा करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेला १९  हजार, कल्याण-डोंबिवली महापालिका ६ हजार, उल्हासनगर महापालिका ५ हजार,  मीरा-भाईंदर महापालिका ८ हजार, भिवंडी-निजामपूर महापालिका ३ हजार ५००, नवीमुंबई महापालिका २१ हजार आणि ग्रामीण क्षेत्रासाठी ११ हजार ५०० याप्रमाणे लशींचे वितरण करण्यात आले आहे.

पनवेलमध्ये दोन केंद्रे

पनवेल : शहरात शनिवारी दोन लसीकरण केंद्रांवर करोना प्रतिबंधक लस दिली जाणार असून यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता लसीकरणाची सुरुवात होणार आहे. कामोठे येथील एम.जी.एम रुग्णालय आणि खारघर येथील डॉ.डी.जी पोळ फाऊंडेशन आयुर्वेदिक महाविद्यालयात हे लसीकरण होणार आहे. पनवेलसाठी  सध्या दोन हजार लशींच्या कुप्या प्राप्त झाल्या  आहेत.

लसीकरण कोठे?

  • ठाणे महापालिकेच्या रोझा गार्डनिया, कोरस, कळवा आणि कौसा आरोग्य केंद्रांवर.
  •  नवी मुंबई पालिका क्षेत्रातील वाशी रुग्णालय, ऐरोली रुग्णालय, डी.वाय. पाटील रुग्णालय नेरुळ, रिलायन्स हॉस्पिटल कोपरखैरणे, अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे.
  •  कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर रुग्णालय, रुख्मिणीबाई रुग्णालय आणि शक्ती धाम विलगीकरण कक्ष येथे.
  •  उल्हासनगर पालिका क्षेत्रातील आयटीआय कोविड सेंटर.
  •  ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय, शहापूर उपजिल्हा रुग्णालय, अंबरनाथ छाया रुग्णालय आणि बदलापूरमधील दुबे रुग्णालय.
  •  यासह आणखी काही केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.