कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्या अभ्यास दौऱ्यासाठी अंदनाम निकोबार येथे जात असून त्यासाठी पालिकेच्या तिजोरीतून ४३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. विकासकामांसाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने ही उधळपट्टी कशासाठी, असे प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने हा दौरा रद्द करावा, अशी मागणी करदात्यांकडून जोर धरू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंदमान-निकोबारमध्ये पालिका नाहीत. येथील स्थानिक महिलांनी स्वयंरोजगार वा बचत गटांच्या माध्यमातून काही भव्यदिव्य केले आहे, असे काही येथे नाही. असे असताना अंदमानला जाऊन महिला समितीच्या महिला कोणत्या प्रकल्पाची पाहणी करणार, असे प्रश्न उपस्थित करीत माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी हा दौरा रद्द करण्याची मागणी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. केवळ एका पालिका अधिकाऱ्याचे चांगभलं आणि एका ठरावीक टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स मालकाचे उखळ पांढरे होण्यासाठी या दौऱ्याचा घाट घालण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

केरळवर नैसर्गिक संकट येऊन गेले. लाखो लोक तिथे बेघर आहेत. तेथे मदतकार्य करण्यासाठी विविध यंत्रणा सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत महिला बालकल्याण समितीच्या महिला या सगळ्या परिस्थितीत अंदनामला जाऊन काय साध्य करणार आहेत, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.

महिला लोकप्रतिनिधींनी विविध प्रदेशांत जाऊन तेथील प्रकल्पांची पाहणी करावी, असा शासन निर्णय आहे. त्यानुसारच दरवर्षी अभ्यासदौरे आयोजित केले जातात. अंदमान दौराही त्याच योजनेचा भाग आहे.

– प्रसाद ठाकूर, जनसंपर्क अधिकारी, पालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 43 lakhs extravagance on the womens tour
First published on: 20-09-2018 at 02:31 IST