कल्याणमधील नेतीवली लोकग्राममध्ये सफाईसाठी विहिरीत उतरलेले तीन जण बुडाल्याची घटना गुरुवारी घडली. त्या तिघांचा शोध घेण्यासाठी विहिरीत उतरलेले अग्निशमन दलाचे दोन जवानही विहिरीत बुडाल्याचे प्राथमिक वृत्त असून घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे पथक शोधमोहीम राबवत आहे.

कल्याण पूर्वेला नेतीवली भागात लोकग्राम परिसरात रस्त्यालगत एक विहिर आहे. या विहिरीत लगत एक नाला असून या नाल्यातील रसायनमिश्रीत पाणी विहिरीत मिसळले गेले. यामुळे विहिरीत रसायनमिश्रीत गाळ साचला होता. हा गाळ बाहेर काढण्यासाठी गुरुवारी सकाळी तीन जण आले होते. यातील एक कामगार विहिरीत बुडाला. त्याला वाचवण्यासाठी उर्वरित दोघेही विहिरीत उतरले. मात्र, ते तिघेही बुडाले. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे दोन जवान मदतीसाठी विहिरीत उतरले. मात्र ते दोघेही पाण्यात बुडाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. राहुल गोसावी हा तरुण सर्वप्रथम बुडाल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य दोन सफाई कामगारांचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर अग्निशमन दलाचे अनंत शेलार आणि प्रमोद वाघचौरे हे दोन जवान बुडाले आहेत.

अग्निशमन दलाचे एक पथक आता सेफ्टी बेल्ट आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन घटनास्थळी पोहोचले आहे. या आधारे आता त्या पाच जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. घटनास्थळावरुन एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उर्वरित चौघांचा शोध सुरु आहे.