सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतच्या कोणत्याही वेळेत खवय्यांसाठी आवडीचा खाद्यघटक असलेली अंडी कल्याण, डोंबिवलीकरांसाठीही जिव्हाळय़ाचा विषय ठरत आहेत. या दोन शहरांमध्ये दररोज पाच लाख अंडी फस्त केली जात असल्याचे मुख्य वितरकांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. अपवादात्मक परिस्थितीत का होईना पण अंडय़ांकडे वळलेला शाकाहारी वर्ग आणि रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झटपट पण पौष्टिक आहार पुरवण्याचा अंडय़ांचा गुणधर्म यामुळे अंडी खाणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
कल्याण, डोंबिवली परिसरातील अंडय़ांचे घाऊक व्यापारी असलेल्या कुमारसेन नाडार यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही शहरांत दररोज पाच लाख अंडय़ांची विक्री होते. नाडार यांच्या दुकानांतून दिवसाला अडीच लाख अंडय़ांची विक्री होते, तर अन्य छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांकडून अडीच लाख अंडी शहरात पुरवली जातात. यापैकी शहरातील हॉटेलांतून दिवसाला सरासरी १६ ते १८ हजार अंडय़ांची मागणी होते. डोंबिवलीतील रामनगर परिसरात अंडे विक्रीचे दुकान असलेल्या सुरेश शेटय़े यांच्या दुकानातून दिवसाला सुमारे एक लाख अंडय़ांची विक्री होत असते. याशिवाय कल्याण, उल्हासनगर येथील किरकोळ व्यापाऱ्यांना कल्याणमधील शब्बीर अहमद या आणखी एका मोठय़ा व्यापाऱ्याकडून अंडय़ांचा पुरवठा केला जातो. या भागात अहमद यांच्यामार्फत टेम्पोने दररोज अठरा हजार अंडय़ांचा पुरवठा केला जातो.
कल्याण, डोंबिवलीतील अंडी खाणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी सोमवारी आणि गुरुवारी मागणीत लक्षणीय घट होत असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच श्रावण महिन्यात अंडय़ांची मागणी
२५ टक्क्यांहून अधिक कमी होते, असेही नाडार यांनी सांगितले.

हैदराबाद, तामिळनाडूत स्पर्धा
भारतात अंडय़ांचे सर्वाधिक उत्पादन हैदराबाद शहरात होत असले, तरी तामिळनाडूतील नमक्कल हे ठिकाण लवकरच सर्वाधिक अंडी उत्पादक शहर म्हणून पुढे येण्याचा अंदाज आहे. हैदराबाद येथे दिवसाला तीन कोटी अंडय़ांचे उत्पादन होत असून त्यापैकी एक कोटी अंडी दररोज मुंबईत येतात. एका ट्रकमध्ये दीड लाख अंडी असतात. असे एकूण सत्तर ट्रक दररोज मुंबईत येतात. यांपैकी दोन ट्रक दररोज सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास डोंबिवलीत येतात. हैदराबाद उत्पादित अंडय़ांचा दर्जा उत्तम असतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

समीर पाटणकर, डोंबिवली