शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत शहर स्वच्छ व हगणदारीमुक्त करण्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिका जोमाने प्रयत्न करत असून गेल्या आठ महिन्यांत पालिकेने सहा हजार शौचायले बांधली आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत वसई-विरार महापालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर २०१५ मध्ये पालिकेने ही मोहीम सुरू केली होती. सुरुवातीला सर्वेक्षण केल्यानंतर १२ हजार कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून विनामूल्य शौचालय बांधण्याचे निश्चित करण्यात आले. छाननीनंतर १० हजार ९३१ लाभार्थी निश्चित झाले होते. एक शौचालय बांधण्यासाठी २० हजार रुपये योजनेद्वारे मंजूर होते.

केंद्र सरकारकडून ८००० रुपये, महापालिकेकडून ८००० आणि राज्य सरकारकडून ४००० रुपयांचा असा एकूण २० निधी प्रत्येकी शौचालयासाठी देण्यात आला आहे. त्यामधून पालिकेने वैयक्तिक ५३८४ शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर वैयक्तिक ४७२ शौचालयाचे काम प्रगतिपथावर आहे.

सामुदायिक शौचालयामध्ये १०५ युनिटमधील २७२ शौचालये बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी त्यामध्ये ३९ युनिटमधील १२१ शौचलये बांधून पूर्ण झाली आहेत.

पूर्वी लाभार्थीना थेट बँकेत पैसे पाठवले जायचे. परंतु नागरिक काम करत नसल्याने पालिका स्वत:चा ठेकेदार नेमून हे काम करत आहे.

– सुखदेव दरवेशी, प्रभारी साहाय्यक आयुक्त

 

हागणदारीमुक्त गावास आमदार चषक पुरस्कार

वसई : हागणदारीमुक्त गावास आमदार चषक पुरस्कार देणार असल्याचे वसई वसई पंचायत समितीने जाहीर केले. स्वच्छतेविषयी आयोजित कार्यशाळेत उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी ही संकल्पना मांडली.

वसई पंचायत समितीच्या वतीने नुकतेच एका स्वच्छतेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वसई पंचायत समितीच्या अखत्यारीत ३१ ग्रामपंचायती येतात.

ही सर्व गावे हागणदारीमुक्त करण्यावर या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त गाव, निर्मल गाव अशा अनेक केंद्र व राज्य सरकारच्या योजना या ग्रामपंचायतींमध्ये प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला.

आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत पंचायत समिती सभापती चेतना मेहेर, जिल्हा परिषद सदस्य देवराम पाटील, राजाराम तांडेल, कल्याणी तरे तसेच पंचायत समिती सदस्य जयवंती बसवत, भारती पाटील उपस्थित होत्या.

ग्रामस्थांना प्रोत्साहन

या वेळी उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी हागणदारीमुक्त गावास आमदार चषक देण्याची संकल्पना मांडली. शासकीय स्तरावर या योजनेसाठी निधी उपलब्ध होणार नसल्याने वैयक्तिक खर्चातून हा चषक देणार असल्याचे ते म्हणाले. गटविकास अधिकारी शीतल पुंड यांनीही या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वच्छ व हागणदारीमुक्त ग्राम अभियानासाठी देण्यात येणाऱ्या आमदार चषक पुरस्कारामुळे ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळेल तसेच स्वच्छतेबाबत चांगला संदेश जाईल असे त्यांनी सांगितले.