ठाणे जिल्ह्यातील वेगाने वाढत असलेल्या बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी शहरात १४ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर शुक्रवारी आणखी ९ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आज सापडलेल्या ९ रुग्णांपैकी ४ रुग्ण हे याआधी करोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले होते. त्यामुळे प्रशासनासमोरील चिंतेत आणखी भर पडली आहे.

याव्यतिरीक्त मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या एका परिचारीकेला, तसेच मुंबईत रेशनिंग ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शहरातील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. बदलापूर शहरात अनेक लोकं अत्यावश्यक सेवेत मोडत असून रोजच्या कामासाठी त्यांचा मुंबईला प्रवास सुरु आहे. यामुळे प्रत्येक दिवशी करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत शहरात ४ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान आज मृत झालेल्या व्यक्तीचं वय हे ६५ वर्ष होतं, मात्र करोनाची लागण होण्याआधीच रुग्णाची प्रकृती ढासळलेली असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

दरम्यान शुक्रवारी २१ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १२ जणांची चाचणी निगेटीव्ह आलेली आहे. शहरात अजुनही १०० रुग्णांवर उपचार सुरु असून ४३ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. अजुन २५ रुग्णांच्या चाचणीचा अहवाल हाती येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या अधिक वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने शहरातील ४६ रहिवासी भाग प्रतिबंधित केलेले आहेत.