तीन दिवसांच्या मुख्य संमेलनाबरोबरच नऊ दिवसांचा नाटय़ोत्सव; नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेची घोषणा
नाटय़संमेलनाच्या ९५ वर्षांच्या इतिहासामध्ये नोंद झाला नसेल असा दिमाखदार आणि भव्य-दिव्य सोहळा ठाण्यात ९६ व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या निमित्ताने करण्यासाठी ठाणे नाटय़ परिषदेच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाच्या नाटय़संमेलनामध्ये नियोजित संमेलनाशिवाय अधिकच्या कार्यक्रमांची रचना करण्यात आली असून ठाण्यातील नाटय़रसिकांना त्याचा अनुभवता घेता येणार आहेत. त्यामध्ये मुख्य तीन दिवसांशिवाय अगोदरचे नऊ दिवस हा नाटय़ोत्सवाचा भव्य-दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. संपूर्ण ठाणे शहराला आणि जिल्ह्य़ाला या उत्सवात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. या कार्यक्रमांची घोषणा करण्याबरोबरच त्याविषयीची सविस्तर माहिती नाटय़ परिषदेच्या नियोजन बैठकीमध्ये गुरुवारी देण्यात आली.
नाटय़कर्मीचा वार्षिकोत्सव अशी ओळख असलेल्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या यंदाच्या आयोजनाचा मान ठाणे शहराला मिळाला आहे. या निमित्ताने ठाणे जिल्ह्य़ातील नाटय़कर्मीची नाटय़सृष्टीला ओळख व्हावी. तसेच येथील हौशी, बाल आणि महिलांच्या नाटय़ चळवळीला दिग्गज नाटय़कर्मीचे मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने या नाटय़संमेलनातील कार्यक्रमांची रचना केली जात आहे. या नाटय़संमेलनाच्या नियोजनासाठी गुरुवारी सकाळी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाच्या सभागृहामध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी ठाण्यातील नाटय़कर्मी, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, नाटय़रसिक आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी परिषदेच्या वतीने संमेलनाची रूपरेषा स्पष्ट केली. यंदाचे नाटय़संमेलन हे पुढील काही र्वष सगळ्या नाटय़ रसिकांच्या लक्षात रहावे, असे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातील प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेऊन हा महोत्सव त्या उंचीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. संमेलन स्वागताध्यक्ष ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नाटय़ परिषद ठाणे शाखेचे अध्यक्ष खा. राजन विचारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नाटय़संमेलन व्हावे ‘नेट’के..

हे नाटय़संमेलन तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी, समाजमाध्यमांमध्ये त्याची चर्चा होऊन ते प्रत्येक नाटय़रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठीही संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ठाणे आर्ट गिल्ड’ या ठाणेकर कलाकारांच्या संस्थेने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयांमध्ये नाटय़संमेलनाच्या चिन्हाची प्रतिकृती नेण्यात येत असून त्यासोबत छायाचित्र काढून समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले आहे. समाजमाध्यमांमध्ये या संमेलनाची चर्चा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हावी हा यामागचा उद्देश असल्याची माहिती, दिग्दर्शक विजू माने यांनी दिली. तसेच शहरातील नाटय़रसिकांना सहभागी करून घेण्यासाठीचे वेगवेगळे कार्यक्रम शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये करण्यात येणार असून मासुंदा तलाव परिसरामध्ये संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

स्वागत समितीमध्ये सहभागी व्हा..
नाटय़संमेलनाच्या निधीसाठी संमेलनाच्या स्वागत समितीमध्ये सहभागी होण्यासाठी शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. स्वागत समितीमध्ये सहभागी होण्यासाठी १४०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. तर बाहेरून येणाऱ्यांसाठी २००० हजारांचे शुल्क आकारले जाईल. संमेलनाचे सगळे साहित्य, भोजन, निवास या सगळ्याचा खर्च यातून केला जाणार आहे. नाटय़संमेलनासाठीच्या स्टॉल खरेदीची माहिती देण्यात आली. अधिक माहितीसाठी नाटय़संमेलन कार्यालय, तालीम हॉल, गडकरी रंगायतन, तलावपाळी, डॉ. मूस रोड, ठाणे (प.) येथे व ९८२१२८१०४९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.