६० रेती कुंडय़ा, ७० झोपडय़ा तोडून भुईसपाट

विरारच्या रेतीबंदरावर गेल्या काही महिन्यापासून रेतीमाफियांकडून तेजीत रेती उपसा सुरु होता. या अवैधपने सुरु असलेल्या खार्डी आणि खाणीवडे येथील रेती उपसावर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ६० रेती कुंडय़ा, ७० झोपडय़ा तोडून भुईसपाट करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ३०० ब्रास रेतीसाठा पुन्हा पाण्यात टाकण्यात आला आहे. या घटनेत पुढील चौकशी सुरु असून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

विरारमध्ये खार्डी, खाणीवडे, वैतरणा उसगाव, नारंगी अशी रेती बंदर आहेत. या रेतीबंदरावर रेतीमाफियांचा नेहमीच डोळा असायचा. त्यातच खार्डी आणि खाणीवडे रेतीबंदरावर बिनधास्तपणे रेतीउपसा सुरु होता. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने या रेतीमाफियांवर धडक कारवाई केली. या कारवाईत ६० रेती कुंडय़ा, ७० झोपडय़ा तोडून भुईसपाट करण्यात आल्या. पाण्याच्या पंपिंग मशीन सुद्धा जळवून नष्ट करण्यात आली. तसेच जप्त करण्यात आलेला ३० ब्रास रेतीसाठा परत पाण्यात टाकण्यात आला.

वसईचे उपविभागीय अधिकारी प्रशांत तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२ जेसीबी, तलाठी, मंडलाधिकारी व विरार पोलिसांचा सहभाग होता. या कारवाईने आता रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान या घटनेत एकाही आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही आहे. मात्र पुढील चौकशी करून लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रशांत तांगडे यांनी सांगितले आहे. तसेच या रेती बंदरावर पुन्हा रेती माफियांकडून रेती उपसा होऊ नये म्हणून महसूल आणि पोलीस मिळून भरारी पथक तयार केलेले आहे. हे पथक या रेती बंदरांवर लक्ष ठेवून असणार आहे. ग्रामदक्षता ज्या समित्या आहेत त्यांना देखील आम्ही सतर्क राहण्यास तांगडे यांनी सांगितले.

पोलिसांच्या गाडीवर डम्पर चढवला

रेतीमाफियांवर करण्यात आलेल्या कारवाई आधी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना या रेतीबंदरावर रेती उपसा मिळाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांचे अंगरक्षक व पोलीस या घटनास्थळी पोहोचले असता, रेतीमाफियांकडून पोलिसांच्या गाडीवर डम्पर चढवण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत निरज लाला (२९) रा. नालासोपारा, अनिल तुकाराम चव्हाण (२६) रा.विरार आणि सुनिल इंद्रजीत चव्हाण (२०) रा. वसई या आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपींकडून पोलीसांनी २ कोटी २५ लाख रुपये किंमतीचे रेती आणि चिखलमातीने भरलेले १५ जेसीबी, १० लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा डंम्पर आणि १२ हजार रूपये किंमतीची ३ ब्रास रेती असा एकुण २ कोटी ३५ लाख १२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.