जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्याशी ग्रामस्थांची चर्चा
येऊर येथील पाटोणपाडा गावात मोठय़ा प्रमाणावर गेल्या काही दिवसांपासून बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. सरकारी जमिनीत होणाऱ्या या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांच्याकडे केल्या आहेत. येऊर पर्यावरण सोसायटीच्या सदस्यांनीही येऊरमध्ये सुरू असलेल्या या बांधकामांच्या तक्रारी पुढे आणल्या असून या तक्रारींची दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सोमवारी स्थानिक ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
येऊर येथील पाटोणपाडा परिसरात सरकारी जमिनीत काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम सुरू आहे. बांधकाम होत असणाऱ्या जागेतून ग्रामस्थांचा जंगलाकडे जाण्याचा रस्ता जातो. तसेच लहान मुलांना शाळेत जाण्याचा मार्ग या बांधकामाच्या जागेतून जातो. ग्रामस्थांना शौचालयाला जाण्यासाठी या परिसरात जावे लागते. या जागेत प्रवेश केल्यास मारहाण करण्याची धमकी ग्रामस्थांना व्यावसायिकाकडून दिली जात आहे. संपूर्ण जागेत चारही बाजूंनी भिंती बांधलेल्या आहेत. मात्र पोलीस उपायुक्तांनी ग्रामस्थांच्या सोईसाठी एका बाजूचा दरवाजा खुला ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असूनही रात्री हा दरवाजा व्यावसायिकाकडून बंद ठेवण्यात येतो. अशा वेळी औषधांची गरज असल्यास अडचणीच्या परिस्थितीत ग्रामस्थांनी काय करायचे, अशी समस्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी काही दिवसाची मुदत मागत या संदर्भात कारवाई करू, असे आश्वासन दिले. या परिसरातील अनधिकृत बांधकामाविषयीच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. या विषयाच्या चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार विकास पाटील यांनी सांगितले.