महापालिका तसेच खासगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांना ताप सर्वेक्षणाची कामे देण्यात आली आहेत. या कामासाठी आरोग्य केंद्रांवर हजर न झालेल्या २११ शिक्षकांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावत थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

त्यामध्ये गैरहजर दिवसांची बिनपगारी रजा धरण्याबरोबर जून महिन्याचे वेतन थांबविण्याचा आणि कामावर हजर झाले नाहीतर साथरोग प्रतिबंधात्मक तसेच भारतीय दंड संहिता कायद्यानुसार दंडनीय किंवा इतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात घरोघरी जाऊन नागरिकांची ताप तपासणी केली जात आहे. ही कामे महापालिका तसेच खासगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांमार्फत करण्यात येत आहेत. त्यात आता शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिक्षण देण्याचेही काम गेल्या आठ दिवसांपासून शिक्षकांना करावे लागत आहेत.  यातच ताप सर्वेक्षणाच्या कामासाठी आरोग्य केंद्रांवर हजर न झालेल्या २११ शिक्षकांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावून थेट कारवाईचा इशारा दिला आहे. त्यापैकी तीन शिक्षकांना करोनाची लागण झाली असून दोन शिक्षकांना कर्करोग आहे तर तीन शिक्षकांना घरीच विलगीकरणात ठेवले आहे. तसेच आठ शिक्षकांची नेमणूक सर्वेक्षणाच्या कामासाठी करण्यात आली आहे. हे शिक्षक त्याठिकाणी काम करीत असतानाही त्यांची आणखी दुसऱ्या भागातही सर्वेक्षणाच्या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या प्रकारामुळे शिक्षकांना ही कामे देताना कोणते निकष लावले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच रविवारी सुद्धा काम करावे लागत आहे.

शंभर घरांच्या सर्वेक्षणाचे लक्ष्य..

शिक्षकांना एका दिवसाला शंभर घरांमध्ये जाऊन ताप सर्वेक्षण करावे लागत आहे. त्यातही प्रत्येकाची ताप मोजणी करण्याबरोबरच त्यांची माहिती अर्जामध्ये नोंदवावी लागत आहे. हे कराताना त्यांनी अनेक अडचणी येत आहेत. या कामामुळे शिक्षक प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत, असेही एका शिक्षकाने सांगितले.

शिक्षकांची मोफत चाचणी करा..

शिक्षकाला करोनाची लागण झाली आणि त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नसतील तर विद्यार्थ्यांपर्यंत हा संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेकडून सर्व शिक्षकांची मोफत चाचणी करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

शिक्षकांना घरोघरी जाऊन ताप तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या कामासाठी उपस्थित न राहिलेल्या २११ शिक्षकांना नोटीसा बजावल्या असून त्यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी अत्यावश्यक सेवेतील या कामांना सहकार्य करावे.

-राजेश कंकाळ शिक्षणाधिकारी, ठाणे महापालिका