News Flash

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनाने घडविले..

माझ्या वाचनाची सुरुवात ही खरे तर माझ्या आईमुळे आणि त्याचबरोबर माझ्या आजोबांमुळेही झाली.

ललित प्रभाकर, अभिनेता                                                                                                                                                                     

वाचन ही माझी केवळ आवड नाही. ती माझी गरज, माझा श्वास आहे. लहानपणी कॉमिक्सपासून सुरू झालेले हे वाचनसंस्कार आजतागायत वाचलेल्या निरनिराळ्या पुस्तकांमुळे वृद्धिंगत होत गेले. माझ्या वाचनाची सुरुवात ही खरे तर माझ्या आईमुळे आणि त्याचबरोबर माझ्या आजोबांमुळेही झाली. आई शिक्षिका असल्याने तिला विविध पुस्तके वाचायला आवडत आणि त्यामुळे ते पुस्तक वाचनाचे संस्कार माझ्यावर होत गेले. जेव्हा मला कोणतेही पुस्तक वाचायचे असे तेव्हा मला ते आईकडूनच अथवा आईच्या शाळेच्या ग्रंथालयातून सहजरीत्या मिळायचे. एकदा माझी तब्येत बरी नसताना उल्हासनगरमधील एका इस्पितळात भरती केले होते. त्या वेळी तिथे बसून किंवा झोपून मला कंटाळा येत असे. त्यामुळे इस्पितळासमोरील एका पुस्तकाच्या टपरीवरून दोन रुपये भाडय़ावर दिवसाला ७ ते ८ पुस्तके वाचायचो आणि अशा प्रकारे तीन ते चार दिवसांत मी पन्नास कॉमिक्स नक्की वाचून काढले असतील. कॉमिक्सविषयी सांगायला गेले तर या कॉमिक्स वाचनामुळे आपल्या कल्पनाशक्तीत खूप वाढ होते. शालेय वयात मी हॅरी पॉटर, वीणा गवाणकर यांचे ‘एक होता काव्‍‌र्हर’, विठ्ठल कामत यांचे ‘इडली ऑर्किड आणि मी’, स्वामी विवेकानंदांची पुस्तके, शिवाजी महाराजांवरील पुस्तके, साने गुरुजी यांची श्यामची आई अशी अनेक पुस्तके वाचली.

महाविद्यालयीन जीवनात माझा वाचन परीघ विस्तारत गेला. त्या वेळी रवींद्र लाखे यांच्याकडून मी नाटकाचं शिक्षण घेत असल्यामुळे बरेचसे लेखक आणि त्यांची पुस्तके आणि नाटके माझ्या वाचनात आली. विलास सारंग यांचं ‘सीसीफस आणि बेलाक्का’, ‘रुद्र’, ‘आतंक’ ही पुस्तके, चं.प्र. देशपांडे लिखित ‘वस्तू’, ‘ढोलताशे’ ही नाटके, गिरीश कर्नाड यांचे ‘हयवदन’ हे नाटक अशी अनेक मराठी पुस्तके आणि नाटके मी वाचली आहेत. बादल सरकार यांचे ‘पगला घोडा’, ‘एवं इंद्रजीत’, इटालो कॅल्विनो यांचे ‘इन्व्हिसिबल सिटी’, काफ्का यांचे ‘कॅसल’ आणि शेक्सपिअर यांची काही नाटकेही मी वाचली आहेत. जसजसा मी मोठा होत गेलो, तसतसा माझा वाचनाचा व्यासंगही वाढत गेला. तरुण वयात मी चिं.त्र्यं. खानोलकर यांचे ‘रात्र काळी घागर काळी’, ‘अजगर’, महेश एलकुंचवार यांचे ‘बातचीत’ हे मुलाखतींवर आधारित पुस्तक, त्यांचे ‘एका नटाचा मृत्यू’,  ‘वाडा..’ ही नाटके ‘मौनराग’ हे ललित लेखांवरील पुस्तक, उदय प्रकाश लिखित ‘तिरीछ’, ‘अरेबा परेबा’ ही पुस्तके, मोहन राकेश यांचे ‘आषाढ का एक दिन’, ‘आधेअधुरे’ ही नाटकेसुद्धा मी वाचली आहेत. पु. ल. देशपांडे यांची ‘बटाटय़ाची चाळ’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, व. पु. काळे यांचे ‘आपण सारे अर्जुन’, ‘भूलभुलैया’, प्र. के. अत्रे यांचे ‘अत्रेप्रहार’, ‘अत्रे उवाच’ ही पुस्तके मी वाचली आहेत. पीयूष मिश्रा लिखित ‘मेरे रंगमंच की कविता’, अरुण कोलटकर यांची ‘भिजकी वही’, ‘चिरीमिरी’, ‘द्रोण’ असे काव्यसंग्रह, पु. शि. रेगे यांची मातृका ही कादंबरीसुद्धा मी वाचली आहे. दुर्गा भागवत लिखित ‘व्यासपर्व’, ‘भावमुद्रा’, मंटो यांच्या कथा, विद्याधर पुंडलिक यांचे ‘टेकडीवरचे पीस’, ‘देवचाफा’ ही पुस्तके मी वाचली आहेत.

सध्या मी दि. बा. मोकाशी यांच्या ‘आदिकथा’, ‘जरा जाऊन येतो’ या कथा वाचत आहे. पुस्तकांच्या शेअरिंगबाबत सांगायचे झाल्यास माझे पुस्तक शेअरिंग हे खूपदा एकतर्फीच असते. म्हणजे मी पुस्तक समोरच्याला देतो परंतु ते खूपदा मला परत मिळतच नाही. सध्या परेश मोकाशीकडून मी दोन पुस्तके वाचावयास आणली आहेत. लेखक म्हणून मला सर्वच लेखक आवडतात. मात्र त्यातल्या त्यात विलास सारंग यांचं ‘आतंक’, ‘सोलेदार’ आणि गिरीश कर्नाडांची पुस्तके मला वाचावयास खूप आवडतात.

शब्दांकन – जतीन तावडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 3:06 am

Web Title: actor lalit prabhakar book library
Next Stories
1 सृजनाची फॅक्टरी : मोठा अर्थ सांगणारी छोटी गोष्ट
2 रुग्णालय की जंगल?
3 चालढकल करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा!
Just Now!
X