विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच युतीच्या उमेदवारांकडून शहर विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनाचा सपाटा लावला आहे. हेही प्रकल्प प्रत्यक्ष आकाराला येण्याची शक्यता नसल्याचा आरोप करत मनसेच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर खाडीकिनारी विमानतळ उभारणीचा प्रतीकात्मक भूमिपूजनाचा कार्यक्रम केला.

निवडणुका आल्या की शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराकडून डोंबिवली विकासाच्या घोषणा केल्या जातात. अनेक प्रकारची विकासाची आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात निवडणुका झाल्या की नंतरच्या पाच वर्षांत विकासाचे एकही मोठे काम केले जात नाही, असा आरोप मनसेने केला आहे.

मोठागाव माणकोली पुलालगतच्या ३०० एकर मोकळ्या जमिनीवर तीन हजार कोटींचा हा प्रकल्प असल्याचे मनसेने जाहीर करून दोन दिवस शहरभर या विमानतळाची जाहिरात केली होती. शहरवासीयांनी मनसेच्या या उपक्रमाचे समाजमाध्यमातून, प्रत्यक्ष संपर्क करून स्वागत आणि कौतुक केले होते.  डोंबिवली रहिवासी एखाद्या घोषणेच्या मागे कसे वाहवत जातात, हेही या विमानतळाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाले, असे मनसेचे नेते राजेश कदम यांनी सांगितले.