लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : मुंबई महानगर क्षेत्रात मोडणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत दोन महिन्यांनंतर म्हणजेच शनिवार सकाळपासून विविध दुकाने सुरू  झाली. या ठिकाणी नागरिकांनी नियम पाळत कपडे, पादत्राणांसह अन्य वस्तूंची खरेदी केली. अनेकांनी छोटय़ा दुकानांमध्येच खरेदी करण्यावर भर दिल्याने मोठय़ा दुकानदारांना मात्र ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली. हेच चित्र सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये दिसून आले.

अनेक दिवसांनंतर दुकाने सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी होईल अशी शक्यता होती. परंतु ग्राहकांनी संयम ठेवत गर्दी केली नाही. तसेच बंदावस्थेत असलेल्या दुचाकींची दुरुस्ती करण्यासाठी अनेकांनी गॅरेज गाठले होते. या निमित्ताने दोन्ही शहरांची विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर येण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत.

राज्यात मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे लाल पट्टय़ात मोडणाऱ्या या शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने सुरू होतील का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. अंबरनाथ शहरातील अनेक दुकाने यापूर्वीच छुप्या पद्धतीने सुरू होती. मात्र शनिवारपासून बहुतांश दुकाने अधिकृतरीत्या सुरू करण्यात आली. दिवसाआड आणि करोनाला रोखण्यासाठीची सर्व उपाययोजना अशा अटी घालून ही दुकाने सुरू करण्यात आली. अनेक दुकानदारांनी शुक्रवारीच आपली दुकाने साफसफाई करून ठेवली होती. शनिवारी कपडे, पादत्राणे, सोने-चांदी, मोबाईल, घडय़ाळ, गॅरेज, बेकरी अशी दुकाने सुरू झाली. अडीच महिन्यांनंतर दुकाने सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी होईल अशी भीती व्यक्त होत होती. मात्र बदलापुरात ग्राहकांनी संयम बाळगत गर्दी करणे टाळले. बहुतांश ग्राहकांनी लहान मुलांच्या कपडय़ांच्या दुकानात गर्दी केली होती. पादत्राणे, मोबाइल या दुकानांमध्येही गर्दी दिसून आली. अनेकांनी बंद पडलेल्या दुचाकी दुरुस्त करण्यासाठी गॅरेज गाठले. नागरिक मुखपट्टी घालून सामाजिक अंतर पाळून दुकानांमध्ये खरेदी करताना दिसून आले. अंबरनाथमध्ये काही ठिकाणी ग्राहक गर्दी करताना दिसले.

बाजारपेठांमध्ये वर्दळ

ज्या ठिकाणी ग्राहक गर्दी करत होते, त्या ठिकाणी दुकानदार स्वत: सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करीत होते. दोन्ही शहरांतील महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ होती. या काळात अनेकांनी रिक्षा वाहतूक सुरू केली होती. सायंकाळी ५ वाजण्यापूर्वीच अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली.