27 September 2020

News Flash

बदलापूरच्या जंगलात प्राण्यांचा वावर

सह्य़ाद्रीच्या माथेरान आणि श्रीमलंग डोंगर रागांच्या परिसरात अजूनही बऱ्यापैकी वनसंपदा टिकून आहे.

रानडुक्कर, वानर, मोर, ससे, कोल्हे आणि भेकर यांचे दर्शन

ठाणे जिल्ह्य़ात इतरत्र दिवसेंदिवस वनक्षेत्र उजाड होताना दिसत असले तरी मुबलक पाणी आणि दुर्गम प्रदेशामुळे बदलापूर परिक्षेत्रातील जंगल मात्र अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे. नुकत्याच झालेल्या प्राणीगणनेत या भागातील जंगलात रानडुक्कर, वानर, तरस, मुंगूस, घार, मोर, भेकर, ससे आदी प्रकारचे वन्यप्राणी आढळून आले आहेत. बदलापूर परिसरात ९,५०० हेक्टर जंगल आहे.

सह्य़ाद्रीच्या माथेरान आणि श्रीमलंग डोंगर रागांच्या परिसरात अजूनही बऱ्यापैकी वनसंपदा टिकून आहे. कारण या भागात पोहोचण्यासाठी सुदैवाने फारसे गाडी रस्ते नाहीत. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झालेली नाही. तसेच या भागात ठिकठिकाणी जलसाठेही आहेत. अगदी मे अखेपर्यंत जंगलात पाणवठे असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी बदलापूरच्या जंगलात सुरक्षित निवारा आहे. मुंबई महानगर प्रदेशात सध्या सर्वात किफायतशीर किंमतीमध्ये घरे उपलब्ध होत असल्याने अंबरनाथ, बदलापूरमधील काँक्रिटचे जंगल वाढत आहे. मात्र वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे या दोन्ही शहरांपासून अवघ्या दहा ते १५ किलोमिटर अंतरावर अजूनही खरेखुरे जंगल आहे. याच परिसरातून उल्हास, बारवी, वालधुनी या नद्यांचे प्रवाह वाहतात. बारवी, भोज, चिखलोली या धरणांमुळे येथील निसर्गसंपदा टिकून राहिली आहे. दरवर्षी बौद्धपौर्णिमेला जंगलातील प्राण्यांची गणना केली जाते. त्यासाठी पाणवठय़ालगत मचाण बांधून त्यावरून रात्रभर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण केले जाते. त्यानुसार यंदाही बदलापूर परिसरातील बारवी, चरगांव, भोज, शीळ, पिंपळोली, चिखलोली आणि कुशिवली या सात ठिकाणच्या पाणवठय़ांचे लगतच्या झाडांवर बांधलेल्या मचाणांवरून निरीक्षण करण्यात आले. त्यात मोठय़ा प्रमाणात वन्यप्राणी आढळून आले.

अधिक प्राणी असण्याची शक्यता

या परिसरातील जंगलामध्ये आंबे, जांभळं, करवंदे आदी रानमेवा मुबलक असल्याने माथेरानपासून मलंग गडापर्यंत मोठय़ा प्रमाणात वानरे आढळून येतात. बारवी तसेच पिंपळोली येथील पाठवठय़ांवर यंदा तब्बल २६ वानरे दिसून आली. कुशवलीचा अपवाद वगळता इतर सर्व सहा पाठवठय़ांवर रानडुक्करे आढळली. याशिवाय बारवीच्या पाणवठय़ावर दोन तर भोज आणि पिंपळोली येथे प्रत्येकी एक तरस आढळला. सर्वच पाठवठय़ांवर मुंगूसांनी पाणी पिण्यासाठी हजेरी लावली. निरीक्षकांनी मचाणांवरून तब्बल ४० मुंगूस मोजले. याशिवाय तब्बल ६० ते ६५ ससे दिसले. स्वभावाने चतुर मानले जाणारे कोल्हेही बदलापूरच्या जंगलात आहेत. यंदा कुशीवली आणि शीळ वगळता इतर पाच पाठवठयांवर १२ कोल्हे दिसले. हरणासारखा दिसणारा भेकर हा प्राणीही बारवी आणि पिंपळोली येथे आढळला. बारवी आणि चरगांव येथे नऊ मोरांनी दर्शन दिले. बारवीचे पाणी वाहते आहे. तसेच जंगलात अन्यत्रही पाणवठे असल्याने यापेक्षा अधिक वन्यप्राणी बदलापूर परिसरातील जंगलात असण्याची शक्यता आहे, अशी माहिती वनाधिकारी डॉ. चंद्रकांत शेळके यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:49 am

Web Title: animals presence in badlapur forest
Next Stories
1 ठाण्यात भर पावसातही खड्डे बुजविणार
2 औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर
3 बॉयलरच्या तपासणीची ‘एमआयडीसी’कडे मागणी
Just Now!
X