वेळखाऊ प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळे वापरकर्ते नाराज
विधानसभा निवडणुकीपूर्वी कळवा-मुंब्रा परिसराचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गाजावाजा करीत देशातील पहिली वायफाय सेवा देणारी स्थानके कळवा-मुंब्रा व्हावीत या दृष्टीने वायफाय सेवेला प्रारंभ केला. या योजना कार्यान्वित करून एक वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी वायफाय सुविधेमुळे स्थानकाच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक सुधारणा अथवा या स्थानकांकडे पाहण्याचा प्रशासन आणि प्रवाशांचा दृष्टिकोन बदलल्याचे जाणवत नाही तर स्थानकात पोहोचल्यानंतर वायफाय जोडणीसाठी करावी लागणारी खटपट, वायफायची रेंज आणि अवघ्या अध्र्या तासामध्ये बंद पडणारी सेवा या सगळ्या प्रकारामुळे मोफत वायफाय नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ कळवा-मुंब्रा स्थानकातील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. तसेच ‘वायफाय’साठी लावण्यात आलेली यंत्रणा रेल्वे प्रशासनाने स्थानकातून हटवल्याने वायफायप्रश्नी प्रवाशांमध्ये संभ्रमच अधिक आहे. राष्ट्रवादीतर्फे वायफाय सेवा सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी या सेवेबद्दल नागरिकांमध्ये अनेक प्रश्न अद्यापही कायम आहेत.
स्पीड चांगला आहे.. सुरुवातीची प्रोसेस थोडी वेळखाऊ आहे. ट्रेनमध्ये चढल्यावर मात्र ‘तो’ मिळत नाही इथपासून ‘वायफाय’ म्हणजे काय रे भाऊ, अशा स्वरूपाच्या चर्चानी गेले वर्षभर कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात अक्षरश: उधाण येत होते. या दोन्ही स्थानकांमध्ये मोफत वायफाय सेवेची सुरुवात झाली आणि येथून प्रवास करणाऱ्यांमध्ये आपापल्या मोबाइलमध्ये कनेक्टिव्हिटी मिळविण्यासाठी लगबग सुरू झाली. सुरुवातीच्या काळात इंटरनेटचा
वेग चांगला असल्याची प्रतिक्रिया एकीकडे व्यक्त होत असताना सुरुवातीच्या नोंदणीची वेळखाऊ प्रक्रिया तरुणांना जाचक वाटत होती. सुरुवातीला तात्काळ सेवा प्राप्त होत असली तरी त्यानंतरच्या काळात या सेवेचा वेग कमी कमी होऊ लागला असून आता तर वायफायची रेंज शोधत फिरण्याची वेळ या स्थानकातील तरुण प्रवाशांवर येऊन ठेपली आहे.
कळवा आणि मुंब्रा ही दोन्ही स्थानके ठाण्याच्या जवळ असली तरी अनेक सुविधांपासून वंचित आहेत. येथे येणाऱ्या प्रवाशाला स्थानकात
पोहोचल्यानंतर इंटरनेटवरून काम करण्याची गरज भासली तर जवळपास कोणत्याही प्रकारची सुविधा या भागात उपलब्ध नव्हती. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कामे प्रवासाच्या काळात पूर्णपणे खोळंबून जायची. हीच अडचण लक्षात घेऊन या दुर्लक्षित स्थानकांमध्ये वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशातील मोठय़ा विमानतळांवर वायफायची मोफत सुविधा मिळत असली तरी रेल्वे स्थानकांवर मात्र ही सुविधा सुरू करण्याचा केवळ विचार सुरू आहे. अखेर विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या भागात वायफाय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. पहिल्याच दिवशी स्थानकात जमलेल्या अनेक युवकांनी आपल्या मोबाइलवरून सुविधेचा वापर करण्यास सुरुवात केली होती. इंटरनेटचा चांगला वेग आणि मोफत मिळत असलेली ही सुविधा वापरण्यासाठी सुरुवातीचे काही महिने येथील स्थानिक तरुणांनी कळवा आणि मुंब्रा स्थानकांत गर्दी करण्यास सुरुवात केली होती. कळवा अथवा मुंब्रा स्थानकात पोहोचल्यानंतर वायफाय सिग्नल मिळतो. त्यानंतर येणाऱ्या होमपेजवर वापरकर्त्यांचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर असा अर्ज भरल्यानंतर वापरकर्त्यांच्या मोबाइलवर येणारा पासवर्ड दिल्यानंतर ही सेवा सुरू होत होती. तांत्रिक गोष्टी पूर्ण केल्यानंतर अर्धा तास प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकत होते. त्यानंतर पुन्हा नोंदणी करणे गरजेचे होते. तसेच प्रत्येक वेळी वापर करताना नोंदणी करणे गरजेचे असल्याने वापरकर्त्यांना वारंवार या तांत्रिक गोष्टींच्या जंजाळात अडकून पडावे लागत होते. त्यामुळे वायफाय नको, पण तांत्रिक गोष्टी आवरा असे म्हणण्याची वेळ इथल्या तरुणांवर आली होती. त्यामुळे मोफत सेवा घेण्यापेक्षा शुल्क देऊन आम्ही सेवा घेऊ असे म्हणणारे तरुण मुंब्रा, कळवा परिसरात पुढे येऊ लागले होते. मात्र मोफत सुविधा घेताना ही प्रक्रिया सुरक्षेच्या दृष्टीने गरजेची बनली आहे.
वायफाय म्हणजे काय रे भाऊ?
वायफाय सेवा सुरू होऊन वर्ष ओलांडले असले तरी अद्यापही अनेक प्रवाशांना या संकल्पनेची नेमकी पुरेशी माहिती नाही. सुरुवातीला वेगाने मिळणारी सेवा आता तर जवळजवळ बंदच होण्याच्या मार्गावर असून तात्काळ सिग्नल मिळताना अनेक अडचणींचा सामान करण्याची वेळ वापरकर्त्यांवर येऊन ठेपली आहे. फक्त वायफाय सुरू झाले याची केवळ अधिकृत घोषणा इथे झाली असल्याने अनेक ज्येष्ठांवर वायफाय म्हणज काय रे भाऊ? असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील वायफाय साहित्य हटवले..
भारतातील वायफाय सेवा देणारे पहिले स्थानक अशी कळवा-मुंब्रा येथील वायफाय सेवेची तुलना झाली असली तरी रेल्वे प्रशासनाशी याबद्दल कोणत्याही प्रकारचा सहकार्य करार झाला नव्हता. अशाच परिस्थितीमध्ये मध्य रेल्वेच्या स्थानकात वायफाय यंत्रणा बसवल्याने रेल्वे प्रशासनाने ती काढण्यास पुढाकार घेतला. त्यानंतर ही सेवा बंद झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र स्थानकाच्या बाहेर आणि अवघ्या हाकेच्या अंतरावर हे साहित्य पुन्हा बसवण्यात आले. मात्र त्याची पुरेशी रेंज अनेक भागांमध्ये व्यवस्थित पोहचू शकत नसल्याने या सेवेची रेंज शोधत बसण्याची वेळ प्रवाशांवर येऊन ठेपली आहे.