“मुंबई महानगर क्षेत्रात (मुंबई बाहेर) करोनाची दुसरी लाट येऊ शकते, त्यासाठी तयारीत रहावे लागेल” असा सूर ठाण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या करोना संसर्गाच्या आढावा बैठकीत व्यक्त झाला. या बैठकीत करोना नियंत्रणासाठी वापरण्यात आलेला मुंब्रा-धारावी पॅटर्न इतर शहरात वापरण्याविषयी चर्चा झाली.

ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील करोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, करोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाउननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू हे करत असताना आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे नागरिकांनी पालन करावे. कायम सतर्क राहावे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या सर्वांना मास्कचा नियमित वापर करावाच लागणार आहे. वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

करोना बरा झाल्यानंतर रुग्णांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असतो हे लक्षात ठेवून रुग्णांवर उपचार करावेत. तसेच कोराना रुग्णावर उपचार करतांना काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक औषधोपचार टाळण्यावर भर देण्यात यावा. करोना बरा झालेल्या रुणांशी यंत्रणांनी एक महिना संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस करोनाची लक्षणे बदलत आहेत. लक्षणे विरहीत रुग्णांवर बारकाईने लक्ष द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

लोकप्रतिनिधींनी जनजागृतीवर भर द्यावा

यंत्रणेचे तीन भागात विभाजन आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. पोलीस व महापालिकांनी ट्रॅकिंग व ट्रेसिंगवर भर द्यावा. चेस द व्हायरस मोहिम प्रभावीपणे राबवावी. रुग्णाला व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची आवश्यकता आहे. रुग्ण बरा होईपर्यंत ऑक्सिजनची व्यवस्था करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. करोना उपचाराबाबत शंका असल्यास टास्क फोर्सला शंका विचारावी असेही त्यांनी सांगितले. सर्व मनपांच्या मागे शासन ठाम व खंबीरपणे उभे आहे. मात्र, प्रयत्नांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, हे स्पष्ट करुन प्रत्येक मनपाने करोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करावे असे त्यांनी सांगितले.

करोना रुग्णांना मानसिक आधाराची गरज

करोना रुग्णांना मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे. करोनावर औषध नाही म्हणून लोक घाबरत आहेत. डॉक्टर-रुग्ण-औषधे यांची गाठ वेळेत होणे आवश्यक आहे. ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि योग्य उपचार यांचा वापर करावा. जनतेमध्ये करोनाविषयी आजही गैरसमज आहेत. त्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीचा सुयोग्य वापर करुन हे संक्रमाण नियंत्रणात ठेवायचे आहे. प्रयत्न करताना स्वत:ची व कुटुंबाचीही काळजी घ्या, असे आवाहन शेवटी मुख्यमंत्र्यांनी केले.