* घरावर गोळीबार करत कुटुंबीयांना बांधले
*आठवडाभरातल्या दुसऱ्या घटनेने खळबळ
बदलापूर शहराजवळील परिसरामध्ये आठवडाभरात दुसऱ्यांदा सशस्त्र दरोडय़ाची घटना घडली आहे. कान्होरमधील पंढरीनाथ देशमुख यांच्या घरात तीन तरुणांनी गोळीबार करत घरातील सव्वादोन लाखांचा ऐवज लुटून नेला आहे. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबीयांना बांधून ठेवत घरातून पळ काढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बदलापूरजवळील इंदगाव येथे सात दिवसांपूर्वीच भरदुपारी एका महिलेला बांधून तीन तरुणांनी दरोडा घातला होता. कान्होर गावातील पंढरीनाथ देशमुख यांच्या घरी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घरात कुटुंबीयांसह जेवण करत असताना तीन अज्ञात तरूणांनी गोळीबार केला. यावेळी देशमुख यांच्या घरातील दूरदर्शन संच आणि एका फोटोवर गोळी बसली. चोरटय़ांनी देशमुख यांच्या घरातील व्यक्तींना दोरीने बांधून ठेवले आणि बंदुकीचा धाक दाखवत घरातील २५ हजारांची रोकड आणि पाच तोळे सोने असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज पळवून नेला. या घटनेनंतर देशमुख कुटुंबीयांनी सुटका करून घेत कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. याप्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदगाव आणि कान्होर या दोन्ही ठिकाणच्या जबरी चोरी प्रकरणी तपास करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केली असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अतिरिक्त अधीक्षक ए. अंभुरे यांनी दिली. तसेच अंभुरे यांनी दोन्ही ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.

ठाणे आयुक्तालयात कधी समाविष्ट होणार?
बदलापूर शहरानजीक अंबरनाथ तालुक्यात मोडणाऱ्या ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कुळगाव ग्रामीण पोलीस ठाणे आहे. या ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असून अन्य पोलीस कर्मचारी आहेत. मात्र, या ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात मोठय़ा गुन्ह्य़ांच्या गंभीर घटना घडल्या असून ठाणे ते बदलापूर भागात झालेले खून, दरोडे, पिस्तूल तस्करी आदींचे गुन्हेगार या भागात वास्तव्याला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, गेल्या सहा महिन्यांपासून हे ग्रामीण पोलीस ठाणे, ठाणे शहर आयुक्तालयाला जोडण्यात येणार असल्याचे सूतोवाच बडे पोलीस अधिकारी करत आहेत. मात्र, अद्याप यावर कोणतीही हालचाल झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे या भागातील गुन्हेगारी फोफावत चालली असून येथील तुटपुंज्या पोलीस बळाला कुप्रवृत्तींशी लढणे कठीण होऊन बसल्याचे येथील सामान्य नागरिक बोलत आहेत.