आरोग्यमान भव’च्या शेवटच्या सत्रात मान्यवरांचा सूर

लोकसत्ता आरोग्यमान भव’चा उत्साही समारोप

ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब हे जीवनशैलीशी निगडित आजार आणि बदललेली आहार शैली यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाय योजनांचा ताळेबंद तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शनिवारी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या कार्यक्रमात मांडला. निरामय आरोग्यासाठी प्रत्येकाने स्वत:कडे लक्ष देण्याची गरज असून, त्यातूनच निराकरण होऊ शकते, असा सूर तज्ज्ञांनी या वेळी व्यक्त केला. दोन दिवस सुरू असलेल्या या परिसंवादाला ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
ठाण्यातील टिप-टॉप प्लाझामध्ये शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस माधवबाग प्रस्तुत ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवाद, प्रश्नोत्तरे आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रमांची विस्तृत माहिती ठाणेकरांना देण्यात आली. डॉ. आशीष देशपांडे, डॉ. राजेंद्र आगरकर आणि वैद्य शैलेश नाडकर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ‘तन्वीशता’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. पीतांबरी, ज्युपीटर हॉस्पिटल, चैतन्य होमिओ, सीमंधर (यशाका), दातार न्यूट्रासिटिकल्स, डेल्टाज् फार्मा, जी.पी.पारसिक बँक, श्री डेन्टल स्पेशालिटी हॉस्पिटल, हावरे, टीप-टॉप प्लाझा आणि वावीकर आय इन्स्टिटय़ूट यांचे प्रायोजकत्व या कार्यक्रमास लाभले.

स्वत:शी नाते दृढ करा – डॉ. आशीष देशपांडे
माणसाला बुद्धिचातुर्य आणि विचारचातुर्याची देणगी असून, त्याद्वारे माणसाने वाईट प्रवृत्ती आणि विचारांवर मात केली पाहिजे. मात्र, हे करण्यासाठी प्रत्येकाकडे स्वत:चा विचार हवा, तरच ती व्यक्ती इतरांचा चांगला विचार करू शकेल. नात्यांचा विचार करताना प्रत्येकवेळी पत्नी, कुटुंब, समाज असा विचार होत असला तरी स्वत:च्या स्वत:शी असणाऱ्या नात्याचा उलगडा होणेही गरजेचे आहे. ते नाते जितके प्रेमळ असेल तितकी ती व्यक्ती दुसऱ्यांशी प्रेमाने वागू शकते.

चालणे हाच उत्तम व्यायाम- डॉ. राजेंद्र आगरकर

मधुमेह आणि रक्तदाब हे आजार भारतात वाढीस लागले आहेत. अनावश्यक गोष्टींचे भरमसाठ सेवन करून या आजारांना प्रोत्साहनच दिले जात आहे. व्यायाम हा त्यावरील उपाय असला तरी त्याकडे दुर्लक्ष केली जाते. औषधे सुरू करण्यास व्यक्तीकडून नेहमीच टाळाटाळ केली जाते. हे चुकीचे आहे. चालणे हा या आजारांमधील सर्वात योग्य व्यायाम असून त्यासाठी कोणत्याही यंत्रणेची, मोकळ्या जागेची अन्य गोष्टींची गरज भासू शकत नाही. घरच्या घरी आपण चालू शकतो. त्यातून आपण आरोग्य राखू शकतो.

आयुर्वेदाचे आहारावर र्निबध
नाहीत -वैद्य शैलेश नाडकर्णी

आहार कोणत्या प्रकारचा हवा याबद्दल कोणत्याही प्रकारचे नियंत्रण आयुर्वेदाने घातलेले नाही. मांसाहार असावा असा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये आहे. मात्र तो पचवण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे का हे पाहणे गरजेचे आहे. प्रत्येकाचे वात, पित्त आणि कफाचे प्रमाण कमी जास्त अशा स्वरूपात बदलत असते. आयुर्वेदामध्ये मांसाहार खाण्याबद्दल विस्तृत विवेचन असून त्यामध्ये कोणकोणता मांसाहार करावा, का आणि कसा करावा याविषयीही सांगितले आहेत. हा व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय नसून गरजेप्रमाणे मांसाहारही करावा, असे शास्त्र सांगते. आयुर्वेदाने प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र विचार केला असून, त्याच्या प्रकृतीनुसार त्याच्या आहाराच्या सूचना केलेल्या आहेत. खाण्याच्या वेळेबद्दलसुद्धा आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले असून रात्रीच्या वेळी फळे खाणे, पाणी पिणे हे शरीराला त्रासदायक ठरू शकते.