भारतीय परंपरांचे जतन करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ठाण्याची स्वागतयात्रा एक सामाजिक चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, क्रीडा, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्राशी संबंधित ४५ हून अधिक चित्ररथ ठाण्यातील स्वागतयात्रेमध्ये सहभागी होणार असून भ्रष्टाचार निर्मूलन, महिला सबलीकरण, स्वच्छता अभियान, महिला स्वयं संरक्षण, संत महात्म्य, गीत महात्म्य, योग प्रशिक्षण, विविध क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक यांचा भरणा या स्वागतयात्रेमध्ये असणार आहे. साईबाबांच्या पालखीबरोबरच सध्या खंडोबा मालिकेतील खंडोबाचे दर्शनही या स्वागतयात्रेच्या निमित्ताने होणार असल्याची माहिती, श्री कौपीनेश्वर सांस्कृति न्यासाचे अध्यक्ष मा. य. गोखले यांनी दिली.
ठाण्यातील श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वागतयात्रेला यंदा १४ वर्षे पूर्ण होत आहे. सोमवारी या स्वागतयात्रेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी न्यासाचे अध्यक्ष मा. य. गोखले, नववर्ष स्वागतयात्रा संचालन समिती स्वागताध्यक्ष श्रीकांत नेर्लेकर उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या सकाळी ६.४५ मिनिटांनी मासुंदा तलावावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास ठाण्याचे महापौरांच्या हस्ते पुप्पहार अर्पण करून कौपीनेश्वर मंदिरात विधीवत पुजा केल्यानंतर सकाळी ७ वाजता स्वागतयात्रेच्या पालखीचे प्रस्तान होईल. कौपीनेश्वर मंदिरातून निघणारी ही पालखी सिध्दिविनायक मंदिराकडून रंगोबापूजी गुप्ते चौकात येईल. तेथे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
पालखी समर्थ मंदिर, सेंट जॉन शाळा मार्गे, दगडी शाळेजवळ येईल. तेथून नंबरानुसार थांबलेले चित्ररथ पालखीसह स्वागतयात्रेमध्ये सामील होती. पुढे गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरी निवास सर्कल, नौपाडा पोलीस स्टेशन, संत नामदेव महाराज चौक, गोखले रोड मार्गे, समर्थ भांडार पर्यंत येऊन स्वागतयात्रा राम मारूती रोडकडे वळेल. राम मारूती मार्गावरून यात्रा संत राम मारूती चौकापर्यंत येऊन तलावपाळी, तेथून साईप्रसाद हॉटेल, नौका विहार या मार्गे पुढे जाईल. स्वागतयात्रा नौका विहार कोपऱ्यापासून रंगोबापूजी गुप्ते चौकाच्या दिशेने मार्गस्थ होईल तर स्वागतयात्रेमध्ये सहभागी नागरिक कौपीनेश्वर मंदिरात येऊन तेथे महाआरती आणि प्रसाद वाटपाने स्वागतयात्रेची सांगता होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव
नववर्ष स्वागतासाठी दिवाळीच्या सणाप्रमाणेच घरोघरी रोषणाई करावी, घर आणि परिसर स्वच्छ ठेऊन रांगोळ्यांच्या पायघडय़ा काढून सुशोभिकरण करावे, असे आवाहन न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी २० मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता मासुंदा तलावातील मंदिरात महापौरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी संपूर्ण तलावाच्या सभोवती एकाच वेळी दीपप्रज्वलन केले जाणार आहे.

रांगोळीच्या पायघडय़ा
संस्कार भारतीच्या वतीने खास श्री कौपीनेश्वर न्यासासाठी रांगोळी काढण्यात येते. यावेळी भगवती शाळेजवळील मैदानावर रांगोळी काढली जाणार आहे, तर गांवदेवी मैदानात सुध्दा एक भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. विजेत्या चित्ररथांना न्यासाच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. वेशभुषेसाठी विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. तर पर्यावरण दक्षता मंचाच्या वतीने वृक्षतोड थांबविण्यासाठी उत्कृष्ट घोषणा फलक तयार करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला पारितोषिक देणार आहे.