१५ दिवसात पाणीपुरवठा नियमित करण्याचे आश्वासन

 

वसई :विरार पूर्वेकडील नागरिकांना मिळणारे गढूळ आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात सोमवारी नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांचा संताप पाहून नमते घेत पुढील पंधरा ते वीस दिवसात तांत्रिक अडचणी दूर करून नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले.

 

विरार पूर्वेकडील फूलपाडा, सहकारनगर, कारगिलनगर आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.  पालिककेडून येणारे पाणी दूषित असून अनियमित पाणीपुरवठा होत असतो. अनेक भागात आठवड्यातून एकदा पाणी  येत. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते.  यामुळे संतप्त रहिवाशांनी मंगळवारी पालिकेवर मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोर्चाला परवानगी नसल्याने माजी सभापती सुदेश चौधरी यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली.    पालिकेकडून येणारे पाणी दूषित असते. जलकुंभाची स्वच्छता झालेली नाही. पालिका केवळ तुरटी टाकून पाणी देते. परंतु ते पाणी एवढे तुरट असते की तोंडात धरवत नाही आणि त्यामुळे घशाचे विकार होतात, अशी तक्रार पद्मा जाधव या महिलेने केली.  पापडखिंड धरणातील पाणी न देता सुर्या धरणाचं पाणी देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

 

नळजोडणी पण  पाणी नाही

 

आमची इमारत ११० खोल्यांची आहे. आम्हाला पालिकेची नळजोडणी आहे. परंतु पाणी नियमित येत नसल्याने  खासगी टँकरद्वारे पाणी मागवावे लागते. महिन्याला एक लाख रुपयांचा खर्च पाण्यावर होतो. वरून पालिकेचे चौदाशे रुपयांची पाणीपट्टी भरावी लागते असे नंदा अम्बेसकर यांनी सांगितले. पाणी नाही तर पाणीपट्टी देखील आकारू नका, असे प्रकाश डेंगे यांनी सांगितले.

 

या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुढील पंधरा ते वीस दिवसात तांत्रिक अडचणी दूर करून पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा केला जाईल.

 -शंकर खंदारे, उपायुक्तवसई-विरार महापालिका