21 April 2019

News Flash

ठाणे-कल्याण-वसई जलवाहतुकीच्या कामाला लवकरच सुरुवात

ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना रेल्वेव्यतिरिक्त वाहतुकीचा सक्षम आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार

(सांकेतिक छायाचित्र)

कल्याण-ठाणे-वसई दरम्यान जलवाहतुकीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या डीपीआरला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरुवात होत आहे. ठाणे महापालिकेच्या सल्ल्याने जेएनपीटी या जेट्टींचे बांधकाम करणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांअंतर्गत डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा रोड येथे चार जेट्टींच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना रेल्वेव्यतिरिक्त वाहतुकीचा सक्षम आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार आहे.

ठाणे-कल्याण-वसई या जलमार्गासाठी ६४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार असून त्यापैकी १०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे-वसई आणि कल्याण-ठाणे-मुंबई अशा दोन टप्प्यांत हा प्रकल्प होणार असून पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई हा ६४५ कोटी रुपयांचा जलमार्ग विकसित करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. आता पहिल्या टप्प्यासाठी केंद्राकडून निधी मिळाला आहे, जसजसे या प्रकल्पाचे काम पुढे सरकेल, तसतसा केंद्राकडून अधिक निधी प्राप्त होईल, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. लवकरात-लवकर या प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे आणि प्रवाशांच्या सेवेत तो दाखल व्हावा, यासाठी शिवसेना यापुढेही पाठपुरावा करत राहणार असल्याचेही श्रीकांत शिंदे म्हणाले.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळामुळे केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना यश आले. याशिवाय शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे केंद्र सरकारकडे गेल्या साडेचार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते. या प्रकल्पासाठी ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पुढाकार घेतला होता.

First Published on November 8, 2018 3:20 pm

Web Title: awaited thane kalyan vasai jetty boat work starting soon