कल्याणमध्ये दुचाकी घसरल्याने बँक कर्मचारी जखमी

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील सूचक नाका येथे खड्डय़ात दुचाकी आपटून खाली पडल्याने एक बँक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. गेल्या सात महिन्यांत रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अपघात होण्याची ही सहावी घटना असून त्याबद्दल नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कल्याण, डोंबिवलीतील खड्डे बुजवण्याची कामे सुरू असल्याने वाहनचालकांनी सावकाश वाहने चालवावीत, असे आवाहन महापालिकेने फलकांद्वारे केले आहे.

उल्हासनगर येथील एका बँकेत नोकरी करत असलेले सुरेश साने हे डोंबिवली एमआयडीसी येथील घरातून मंगळवारी नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. शिळ रस्त्यावरील कल्याण पूर्वेकडील सूचक नाका येथे खड्डे चुकवत असताना त्यांची दुचाकी एका खड्डय़ात जोरात आपटली व ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने एक ट्रक येत होता. मात्र, ट्रकचालकाने तातडीने ब्रेक दाबून गाडी थांबवल्याने साने यांचा जीव वाचला. दुचाकीवरून पडल्यामुळे साने यांच्या पायाच्या हाडाला दुखापत झाली आहे.

गेल्या महिनाभरात कल्याण शहर परिसरातील रस्त्यांवर खड्डय़ात दुचाकी आपटून, पाय मुरगळून पाच जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनाने १३ कोटी रूपये खर्च करून भर पावसात शहरातील खड्डे भरण्याची कामे सुरू केली आहेत. मुख्य रस्त्यांवरील खड्डे पालिकेकडून भरले जात आहेत. शहरांतर्गत रस्त्यांवरील खड्डे मात्र पालिकेकडून भरण्यात येत नाहीत, अशा तक्रारी पुढे येत आहेत. अशा खड्डय़ांमध्ये अपघात झाल्यानंतर पालिका अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरणार का, असे प्रश्न रहिवासी करीत आहेत.

खड्डय़ांमुळे अपघातांची मालिका

  • २३ जानेवारी २०१८ कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रस्ता येथे रस्ता ओलांडताना टेम्पोखाली येऊन जेस्लीन आयाकुट्टी याचा मृत्यू.
  • २ जून २०१८ कल्याणमधील शिवाजी चौकात एक दाम्पत्य आपल्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात होते. दुचाकी तेथील खडीवर घसरल्याने आरोह आक्राळे (८) याचा मृत्यू.
  • ७ जुलै २०१८ शिवाजी चौकातील खड्डेयुक्त. रस्त्यावर दुचाकी घसरून मनीषा भोईर यांचा मृत्यू.
  • ११ जुलै २०१८ कल्याण पूर्वेतील मलंग रस्त्यावरील द्वारली येथे तबेला कर्मचारी अण्णा यांचा खड्डय़ात पाय मुरगळून ते खाली पडले. मागून आलेल्या वाहनाखाली सापडून ते मरण पावले.
  • १३ जुलै २०१८ गांधारे पूल येथे खड्डय़ात दुचाकीवरून पडून मागून आलेल्या ट्रकखाली सापडून नांदकर येथील कल्पेश जाधव याचा मृत्यू.
  • १४ जुलै २०१८ कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथे दुचाकी खड्डय़ात आपटून पालिकेचा कर्मचारी विलास दलाल गंभीर जखमी.