रस्ता दुरुस्तीसाठी आणलेले ‘पेव्हर ब्लॉक’ उड्डाणपुलावरील पदपथावरच
खड्डय़ांमुळे बदलापूरकरांना शहरातील एकमेव उड्डाणपुलावरील प्रवास खडतर झाला होता. त्याची दुरुस्ती झाली खरी, मात्र पश्चिमेकडच्या उड्डाणपूलसमोरील चौकात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम राहिले आहे. त्यासाठी लागणारे पेव्हर ब्लॉक उड्डाणपुलावरील पादचाऱ्यांच्या मार्गात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा एकमेव उड्डाणपूल गेल्या काही वर्षांपासून अपुरा पडू लागला असून त्याची क्षमता संपल्याचे जाणवते आहे. त्यात गेल्या काही महिन्यांत यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्याची दिवाळीपूर्वी दुरुस्ती करण्यात आली खरी, मात्र उड्डाणपूल सुरू होतो, त्या ठिकाणचा चौक अद्याप नादुरुस्त आहे. त्यामुळे येथे धुळीचे साम्राज्य पसरले असून उखडलेल्या खडीमुळे दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या चौकाच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराकडून दसऱ्यापूर्वी हाती घेण्यात आले होते. मात्र लांबलेल्या पावसामुळे हे काम रखडले. मात्र त्यासाठी आणण्यात आलेले पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या कडेला आणि उड्डाणपुलावर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते आहे. येथून अनेक नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक ये-जा करत असतात. पूर्वेत असलेल्या आदर्श विद्यालय, महाविद्यालयाचे बहुतेक विद्यार्थी याच मार्गाचा वापर करीत असतात. उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेल्या कठडय़ांवर सायंकाळी ज्येष्ठ नागरिक बसत असतात. त्यामुळे त्यांना उड्डाणपुलावरील छोटा मार्ग उपयोगी पडत असतो. मात्र त्याच ठिकाणी पेव्हर ब्लॉक ठेवले असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून कसरत करत चालावे लागते. अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे पेव्हर ब्लॉक हटवावेत अशी मागणी आता पादचारी करत आहेत.
चौकात ‘काळे’ मुखवटे
उड्डाणपुलाजवळील चौकाची दुरवस्था झाल्याने येथे धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्या धुळीची तीव्रता इतकी आहे की येथील चौकात असलेले मुखवटे काळवंडले आहेत. शहरांतील चौकांची शोभा वाढवण्यासाठी तयार केलेले देखावे बिकट अवस्थेत असून त्यामुळे शोभा वाढण्याऐवजी कमी होते आहे. त्यामुळे याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.