कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला ‘ब’-वर्ग दर्जा प्राप्त होऊन तब्बल नऊ वर्षे उलटली असली शहराच्या विकासाचा गाडा हाकणाऱ्या अभियंत्यांच्या मंजूर असलेल्या १४ पदांपैकी केवळ चारच जागा भरण्यात आल्या आहेत. दहा जागा अद्याप रिक्तच असल्याची माहिती नुकतीच पुढे आली आहे. या दहा पदांवर अधिकारी व अभियंते वर्ग करावेत अथवा प्रतिनियुक्तीवर घेण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी नगरपालिकेने नगरपरिषद संचालनालयाकडे केली आहे. त्यामुळे ‘ब’ दर्जाच्या आकृतिबंधाप्रमाणे मंजूर पदेच अद्याप भरली गेली नसतील, तर पालिकेला नव्याने प्राप्त झालेला ‘अ’- वर्ग दर्जाचा आकृतिबंध नगरपरिषद संचालनालय किती वेळेत मंजूर करेल यावरच अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गेल्या काही वर्षांत बदलापूरची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. येथील रहिवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आखण्यात आलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी येथे अभियंत्यांची आवश्यकता आहे. नगर परिषदेच्या विविध विभागांमध्ये योग्य त्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. कुळगाव-बदलापूरची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ लाख ७४ हजार २२६ इतकी आहे. त्यानुसार शासनाने नगर परिषदेला अ वर्ग दर्जा दिला आहे. सद्य:स्थितीत नगर परिषद क्षेत्रात ७० हजार निवासी सदनिका असून लोकसंख्या सुमारे पावणेतीन लाखांपर्यंत पोहचली आहे. नगर परिषद क्षेत्रात जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून अंतर्गत भुयारी गटार योजना, बीएसयूपी घरकुल योजनेची कामे सुरू आहेत. याशिवाय भविष्यात अमृत योजना, स्मार्ट सिटीसारख्या योजना राबवण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. असे असताना अत्यंत तुटपुंज्या कर्मचाऱ्यांसह पालिकेचे कामकाज सध्या चालू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur municipal engineer posts empty
First published on: 31-07-2015 at 12:32 IST