* मुंबई पोलिसांच्या ‘आय’ शाखेची माहिती
* विविध गुन्ह्य़ांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न
बेकायदा वसाहती आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या वसई-विरार शहरात बांगलादेशी नागरिकांचे प्रमाणही अधिक आहे. मुंबई पोलिसांच्या आय शाखेने मुंबई आणि परिसरातून बांगलादेशी नागरिकांच्या केलेल्या कारवाईत सर्वाधिक बांग्लादेशी वसई-विरारमध्ये आढळले आहेत. विशेष म्हणजे नालासोपारा येथे सर्वाधिक बांगालदेशी असून बनावट नोटा वितरित करण्याचा मोठा व्यावसाय येथे चालत असल्याचे दिसून आले.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा धोका समोर आला होता. मुंबई पोलिसांची आय शाखा बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करत असते. या शाखेतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक बांगलादेशी हे वसई-नालासोपारा परिसरात राहत आहेत. येथील टाकीपाडा, संतोष भुवन आदी परिसरात त्यांचे वास्तव्य असते. ते बांधकाम मजूर म्हणून वावरत असले तरी अनेक गैरकृत्यांत त्यांचा धोका असतो. आय शाखेने गेल्या ११ महिन्यांत मुंबई आणि परिसरातून ८८६ बांगलादेशी नागरिक शोधून काढले आणि त्यांच्यावर कारवाई करून परत पाठवले. त्यातील सर्वाधिक बांगलादेशीे हे नालासोपारा, विरार परिसरात राहणारे आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांत झालेल्या हत्या, दरोडे आदी गंभीर गुन्ह्य़ात बांगलादेशी नागरिकांचा सहभाग वाढला आहे. सोनसाखळी चोरीमध्येही बांगलादेशी तरुण आढळले आहेत. वसई विभागात सात पोलीस ठाणे असून त्यांना बांगलादेशी नागरिकांना शोधून काढण्यात अपयश आले आहे. जे काम मुंबई पोलीस वसईत येऊन करू शकतात, ते वसईचे पोलीस का करू शकत नाहीत, असा सवाल उपस्थित झाला आहे.

नालासोपाऱ्यात बनावट नोटांचे केंद्र
बनावट चलनी नोटा भारतीय बाजारपेठेत आणून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे षड्यंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी या बांगलादेशी नागरिकांना हाताशी धरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणीे अटक केलेले सर्व बांगलादेशी हे नालासोपारा परिसरात राहत असल्याचे आढळले आहे. येथे ते पत्नी, मुलांसह राहतात, पण सीमेवरून नोटा आणून त्या खपवण्याचे काम ते करतात. त्यांच्या अनेक टोळ्या कार्यरत असून त्याचे केंद्र नालासोपारा परिसरात कार्यरत असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. त्यांना या नोटांमागे कमिशन मिळते. महिलांचाही त्यात मोठा सहभाग आहे. वसईतील पोलीस बांगलादेशी नागरिकांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोपही मुंबई गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. यासाठी मोठे कोम्बिंग ऑपरेशन करण्याचीे गरजही त्यांनी व्यक्त केली.