गेल्या चार दिवसांतील पावसामुळे बारवी धरणातील जलसाठय़ात आठ टक्क्यांनी वा
पावसाळय़ाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत वरुणराजाने पाठ फिरवल्याने राज्यभरासह ठाणे जिल्ह्यावर ओढवलेले पाणीसंकट गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे काहीसे कमी झाले आहे. एरवी ऑगस्टच्या मध्यावर ओसंडून भरून वाहणारे बारवी धरण सप्टेंबर उजाडला तरी जेमतेम ६० टक्केच भरल्याने मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांवरही ४० टक्के पाणी कपातीचे संकट होते. मात्र गणेशोत्सव काळात पडलेल्या संततधार पावसामुळे बारवी धरण तब्बल ८२ टक्के भरले असून गेल्या दोन दिवसात धरणाच्या जलसाठय़ात आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील आंध्र धरणाच्या पाणी साठय़ात गेल्या आठ दिवसात सहा टक्क्यांची भर पडली आहे. त्यामुळे येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होणारी ४० टक्क्यांची पाणी कपात तूर्तास लांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, वर्षभरातील पाण्याचे नियोजन लक्षात घेऊन सध्या लागू असलेली १५ टक्के पाणी कपात कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
tv02
ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. दरवर्षी ही धरणे ऑगस्ट महिन्याच्या मध्यावरच ओसंडून वाहू लागतात. या धरणातील पाणी उल्हास नदीच्या पात्रातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर या महापालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका उचलतात. उल्हास नदीच्या पात्रातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने १५ टक्के पाणी कपात लागू केली होती. जुलै महिन्यात ही कपात बंद होणे अपेक्षित होते. मात्र पावसाने दडी मारल्याने ही कपात कायम ठेवण्यात आली. असे असतानाच सप्टेंबर महिना उजाडूनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने धरणांच्या जलसाठय़ात पुरेशी वाढ होऊ शकलेली नाही. यामुळे ही आपत्कालीन परिस्थिती ओळखून पाटबंधारे विभागाने तब्बल ४० टक्के पाणी कपातीचा नवा प्रस्ताव तयार केल्याने मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांवर पाणीसंकट ओढावले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्य़ात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली असून भातसाच्या पाणी साठय़ात सात टक्क्यांनी, मोडकसागरच्या पाणी साठय़ात १६ टक्क्यांनी, तर तानसा आणि बारवी या दोन्ही धरणांच्या पाणी साठय़ात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच उल्हास नदीमार्फत ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील आंध्र धरणाच्या पाणी साठय़ात गेल्या आठ दिवसात सहा टक्क्यांची वाढ झाली असून, या धरणातील एकूण जलसाठा ४८ टक्के इतका झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.