अ‍ॅम्फोटेरिसिनची २४०० इंजेक्शने रुग्णांना मोफत

भगवान मंडलिक
कल्याण : म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आजाराच्या ठाणे जिल्ह्यातील ६४ रुग्णांवर राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात आले. या उपचारावरील अ‍ॅम्फोटेरिसिन इंजेक्शने महागडी आणि बाजारात उपलब्ध होत नसल्याने या योजनेच्या माध्यमातून ही इंजेक्शने रुग्णालयांना तातडीने मोफत उपलब्ध करून दिली, अशी माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ठाणे जिल्हा विभागीय व्यवस्थापक डॉ. वैभव गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

करोनाचे उपचार घेत असलेल्या किंवा करोना होऊन गेलेल्या अनेक रुग्णांना उपचारानंतर काही दिवसांत डोळ्यांना बाधा करणाऱ्या म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आजाराची बाधा झाली. अचानक उद्भवलेला हा आजार झपाटय़ाने वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणेमध्ये अस्वस्थता वाढली. काळी बुरशीवरील उपचाराचा खर्च सामान्य रुग्णांना अजिबात परवडणारा नव्हता. या आजारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची किंमतही जास्त होती. तसेच इंजेक्शन बाजारात सहज उपलब्ध होत नव्हती. करोना रुग्णांवर गेल्या दीड वर्षांत राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यांचे संलग्नीकरण करून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने रुग्णांना विमा संरक्षण आणि मोफत उपचारासाठी निधी उपलब्ध करून दिला. फुले जनआरोग्य योजनेतून एक लाख ५० हजार रुपयांचा निधी करोना रुग्ण उपचारासाठी उपलब्ध करून दिला जात होता.

राज्य शासनाने मे २०२१ मध्ये करोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या मोफत उपचारांप्रमाणे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनाही विमा संरक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील वैद्यकीय पॅकेजचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात काळी बुरशीचे रुग्ण वाढू लागल्याने तातडीने या विमा संरक्षण योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ३० सप्टेंबपर्यंत ही योजना कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील अंगीकृत रुग्णालयांमध्ये मे ते जून या कालावधीत काळी बुरशीचे बाधा झालेले अनेक रुग्ण उपचार घेत होते. त्यांना या विमा संरक्षण योजनेचा लाभ देण्यात आला. अ‍ॅम्फोटेरिसिनची दोन हजार ४०० इंजेक्शने रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली. बाजारात ही इंजेक्शने, काळी बुरशी प्रतिबंधित औषधे उपलब्ध नव्हती. ती तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले, अशी माहिती डॉ. वैभव गायकवाड यांनी दिली. डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात काळी बुरशीची बाधा झालेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले, अशी माहिती या रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी दिली. नवी मुंबईत सर्वाधिक ८४ रुग्ण आढळले. यामधील ४८ रुग्णांनी आजारावर मात केली.

लाभ घेतलेले रुग्ण

  • छ. शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा –    १७
  • बाज आर. आर. रुग्णालय, डोंबिवली – १
  • वेदांत रुग्णालय, घोडबंदर रोड, ठाणे – २३
  • डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय – १३
  • होरायझन प्राइम रुग्णालय –   ३
  • तेरणा रुग्णालय –    २
  • इंद्रावती रुग्णालय –   २
  • एनएमएमसी रुग्णालय – ३

ठाणे जिल्ह्यत म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागल्यानंतर सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अशा सर्व बाधित रुग्णांना तातडीने म.  फुले जन आरोग्य योजनेतून दीड लाख रुपयांचा लाभ रुग्णालयाच्या माध्यमातून दिला. खर्च परवडत नाही म्हणून एकही रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहता कामा नये, या दृष्टीने काळजी घेऊन या योजनेची ठाणे जिल्ह्यत अंमलबजावणी केली.

– डॉ. वैभव गायकवाड, विभागीय व्यवस्थापक, महात्मा फुले जनआरोग्य योजना, ठाणे जिल्हा