12 December 2017

News Flash

ठाणेकरांची चिमणीगणना

जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने होप संस्थेने या विशेष चळवळीची घोषणा करण्यात आली आहे.

प्रतिनिधी, ठाणे | Updated: March 21, 2017 3:05 AM

‘होप’ आणि पर्यावरण दक्षता मंच यांची संयुक्त  मोहीम

शहरात कोणते पक्षी आहेत? त्यांची संख्या किती? या प्रश्नांचे उत्तर शोधण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. पक्षांची गणना करण्यासाठी शास्त्रोक्त पर्याय निवडला जात नाही अशी या क्षेत्रातील जाणकरांची नेहमीच तक्रार असते. पक्षांची मोजणी करताना चिमण्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असाही तक्रारीचा सूर असतो. हे लक्षात घेऊन ठाण्यातील ‘होप’ आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील चिमण्या मोजण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात शहरभर ही मोहीम राबवली जाणार असून त्यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी करुन घेण्याचा या संस्थांचा प्रयत्न आहे. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने होप संस्थेने या विशेष चळवळीची घोषणा करण्यात आली आहे.

ठाणे शहरात बदलत्या ऋतुनुसार येणारे स्थलांतरित तसेच येथेच वास्तव्य करणाऱ्या पक्षांची होप संस्थेकडून प्रत्येक सहा महिन्यांनी गणना केली जाते. कोणत्या प्रजातीचे पक्षी ठाण्यात असून याची माहिती मिळविण्याचा हा प्रयत्न असतो. सगळ्याच प्रजातीमधील पक्षांची नोंद होत असली तरी पक्षी गणनेत चिमण्यांना विशीष्ट असे स्थान नसते. हे लक्षात घेऊन या संस्थानी चिमण्यांची स्वतंत्र्य गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात सलग दहा दिवस ठाणे महापालिका क्षेत्रात शहरातील पक्षीप्रेमी, सामान्य नागरिक शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर फिरून शहरातील चिमण्या मोजताना दिसणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील चिमण्यांची अधिकाधिक नोंद होणार असून नेमका आकडा मिळण्यास मदत होईल असा दावा संस्थेने केला.

गणना अशी..

ठाणे शहरामध्ये एकाच प्रजातीच्या चिमण्या आढळत असून त्यामध्ये केवळ नर आणि मादी असा फरक आहे. नर काळपट रंगाचा तर मादी फिकट रंगाची असते. ठाणे महापालिका हाद्दीत १६ ते २५ एप्रिल या कालावधीत ही गणना सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळात करता येणार आहे. १४ वर्षांवरील मुलांपासून सगळ्यांना या चिमणी गणनेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. या उपक्रमाची महिती संस्थेच्या www.hopethane.org या संकेतस्थळावरून मिळू शकणार आहे. नागरिकांना त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे शाम घाटे यांनी दिली.

First Published on March 21, 2017 3:05 am

Web Title: birds calculation campaign will be conducted in thane