News Flash

भाजपचे फेसबुकवर ‘से नो टू शिवसेना’

कल्याणमधील एका मोठय़ा गटाने फेसबुकच्या संकेतस्थळावर ‘से नो टू शिवसेना’ नावाचे पेज तयार केले

 

कल्याण, डोंबिवलीतून सेनेला हद्दपार करण्याचे नेटकरांना आवाहन

केंद्र आणि राज्यात युती करणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्यासाठी एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे, समाजमाध्यमांतून मात्र भाजप सेनेवर तुटून पडत असल्याचे चित्र आहे. कल्याणमधील एका मोठय़ा गटाने फेसबुकच्या संकेतस्थळावर ‘से नो टू शिवसेना’ नावाचे पेज तयार केले असून त्यावरून महापालिकेतील गैरकारभाराबद्दल सेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. यामागे भाजपच्या शहरातील काही वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याची कुणकुण लागल्याने आता सेनेनेही सोशल मीडियावरून भाजपवर टीका आरंभली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अद्याप सुरू झाला नसला तरी सोशल मीडियावरून विविध पक्ष आणि उमेदवार आधीपासूनच आपापल्या मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेक खासगी सल्लागार संस्था आणि आयटी तज्ज्ञांना कामाला लावण्यात आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचे काम करण्यासोबतच प्रतिस्पर्धी पक्षांवर नकारात्मक टिप्पणी करण्याचे कामही या माध्यमांतून करण्यात येत आहे. मात्र, पालिकेत सध्या एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपमध्येच हे ‘ऑनलाइन’ युद्ध अधिक भडकले आहे.

फेसबुकवर ‘से नो टू शिवसेना’ नावाचे एक पेज तयार करण्यात आले असून शिवसेनेच्या आधिपत्याखाली असलेल्या पालिकांतील गैरकारभार आणि शहरांची दुरवस्था यांचे नियमित वर्णन त्यावरून करण्यात येत आहे. शिवसेनेने विरोधात बोलणाऱ्या सगळ्या मंडळांची मते या माध्यमातून पद्धतशीरपणे प्रसारित केली जात असून त्यामुळे हे पेज नेमके कोणी सुरू केले आहेत याविषयी नेटकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, हे काम भाजपच्या पाठीराख्यांचेच असून या सर्व यंत्रणेला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ असल्याचा सेनेच्या नेत्यांचा संशय आहे. त्यामुळेच शिवसेनेनेही आपल्या समर्थक नेटकऱ्यांकरवी भाजपवर टीकेला सुरुवात केली आहे.

‘आमचा संबंध नाही’

फेसबुकवर सुरू असलेल्या ‘से टू नो शिवसेना’ या पेजविषयी भाजपचे कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता अशा कोणत्याही पेजविषयी आपणास काहीच माहिती नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. असले उद्योग आम्ही करत नाही, असेही ते म्हणाले. यासंबंधी शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता या पेजवर आमचे सैनिकही सडेतोड उत्तर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला रस्त्यावरील लढाईत जास्त रस असतो. त्यामुळे ‘त्यांनी’ ऑनलाइन लढत राहावे, असा टोलाही या नेत्याने लगावला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 12:02 am

Web Title: bjp is not interested to alliance with shiv sena in kdmc
Next Stories
1 बोलत्या नाण्याच्या दर्शनाने ठाणेकर अवाक्
2 शिवसैनिकांमध्ये उमेदवारीवरून हाणामारी ; कल्याणमध्ये इच्छुकांच्या मुलाखतीवेळी प्रकार
3 काश्मीरमधून सैन्य काढून घेण्याची पाकची मागणी भारताने फेटाळली
Just Now!
X