भाईंदर : मीरा रोड येथील पंचतारांकित सेव्हन इलेव्हन क्लबचा मुद्दा नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित झाल्याने मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तिवरांची कत्तल करून तसेच पाणथळ जागांचा विनाश करून क्लब उभारण्यात आल्याचा आरोप खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला.

हा क्लब भावाचा असल्याची सारवासारव आमदार नरेंद्र मेहता यांनी केली असली तरी कायम विविध करणांमुळे चर्चेत असलेले मेहता सेव्हन इलेव्हन क्लबच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेतच शिवाय या विषयावर समाजमाध्यमांवरसुद्धा चर्चेला उधाण आले आहे.

मेहता यांच्या निकटवर्तीयांकडून मीरा रोडच्या कनाकिया भागात पंचतारांकित क्लब उभारण्यात आला आहे. हा क्लब तिवरांचा तसेच पाणथळ जागांवर उभारण्यात आला आहे अशा तक्रारी आल्यानंतर पर्यावरणमंत्र्यांनी त्याबाबतचा अहवालदेखील मागवला होता. शिवाय या क्लबच्या इमारतीला सरकारकडून देण्यात आलेली विशेष परवानगीदेखील वादाचा मुद्दा ठरली आहे. क्लबशेजारून ३० मीटर रुंदीचा विकास आराखडय़ातील रस्ता जात असून या रस्त्याला लागून असल्याने महामार्गासाठी लागू असलेले धोरण क्लबला लागू करावे असे सरकारने म्हटले असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही सरकारची क्लबवर असलेली विशेष मर्जी लपून राहिलेली नाही.  मेहता यांनी झालेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न  विधिमंडळात केला. हा क्लब नसून भावाचा असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले मात्र त्यानंतरही त्यांचा क्लबमध्ये असलेला अप्रत्यक्ष सहभाग लपून राहिलेला नाही.  मेहता यांनी शहराचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील वाढत्या तिवरांच्या झाडांचा तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रामुळे येणाऱ्या अडचणींचा विधिमंडळात पाढा वाचला अधिवेशनातील त्यांचे हे भाषणही  चर्चेचा मुद्दा बनले आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात मोडणाऱ्या स्वत:च्या जागेत डोंगर खोदण्याचा आरोप असणारे नरेंद्र मेहता यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे का, अशी चर्चा आता समाजमाध्यमांवर होऊ  लागली आहे.