८५ आश्वासनांपैकी बाराच पूर्ण; ७३ विकासकामे लालफितीत अडकली
शिवसेना- भाजप वचननामा
पाच वर्षांपूर्वी, १८ ऑक्टोबर २०१० रोजी शिवसेना-भाजपने कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी वचननामा प्रसिद्ध केला होता. या वचननाम्यात (जाहीरनामा) नागरी सुविधा देणारी ८५ आश्वासने शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी जनतेला दिली होती. विकासाच्या या आश्वासनांना भुलून जनतेने शिवसेना, भाजपला भरभरून मतदान केले. पालिकेत शिवसेना, भाजप युतीची सत्ता आली. पण, जनतेच्या पदरात काहीही पडले नाही. पालिकेत युतीची सत्ता असताना सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत ८५ पैकी फक्त १२ आश्वासने रडतखडत पूर्ण केली आहेत. उर्वरित ७३ आश्वासने नेहमीप्रमाणे लालफितीत गुंडाळून ठेवण्यात सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली.
युतीचा पालिकेतील कारभार आणि पाच वर्षांतील विकासकामांचा वेग अत्यंत मंद होता. वचननामा प्रसिद्ध करताना जनतेला दिलेली सर्व विकासाची आश्वासने पूर्ण केली जातील. कल्याण-डोंबिवलीत ‘रामराज्य’ आणण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन वचननाम्याचे कर्तेधर्ते शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिले होते. पाच वर्षांच्या काळात शिवसेनेच्या वैजयंती गुजर-घोलप, कल्याणी पाटील महापौर होत्या. स्थायी समितीच्या तिजोऱ्या पाच वर्षे शिवसेनेच्या सभापतींनी सांभाळल्या. महापौर वैजयंती गुजर यांच्या कार्यकाळात रस्त्यांवरील खड्डय़ांचा विषय गाजला. गुजर यांनी कल्याणमध्ये नक्षत्रांच्या झाडांची बाग फुलविण्याचा विडा उचलला होता. लाखो रुपये बागेवर खर्च झाले. बागेचा ट्रॅक तयार झाला. पाच वर्षे उलटली तरी नक्षत्रांची झाडे काय फुलली नाहीत. फक्त, पुतळ्यांच्या चेहऱ्यांची दिशा बदलणे आणि पुतळे उभारणे आदी कामे महापौर गुजर यांनी केली.
महापौर कल्याणी पाटील यांच्या शेवटच्या अडीच वर्षांच्या काळात पालिकेत प्रशासन शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. शहराची वाताहत होत असल्याचे त्या उघडय़ा डोळ्याने पाहत होत्या. जनतेच्या या दोन्ही महापौरांकडून पारदर्शक कारभार, विकासकामांविषयी खूप अपेक्षा होत्या. त्या फोल ठरल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे. पालिकेत सत्ता आणण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण यांनीही कधी जनतेला पाच वर्षांपूर्वी कोणती आश्वासने दिली होती. ती आपल्या नगरसेवकांनी किती पूर्ण केली. म्हणून आढावा घेण्याची गरज वाटली नाही.
निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी ‘करून दाखवले’ म्हणून शिवसेना नेत्यांनी गेल्या दीड महिन्यापूर्वी घाईने शहरातील रखडलेल्या प्रकल्पातील तरण तलाव, रस्त्यावरची व्यायामशाळा, विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप, सुविधा नसलेल्या वाचनालयाचे उद्घाटन करून फार भव्यदिव्य कामे केल्याचा देखावा उभा केला. निधीची कमतरता नसताना शहरातील विकास प्रकल्प रखडले.

काय करून दाखवले?
’प्रभाग क्षेत्रात जलवाहिन्या टाकल्या, जलुकंभ बांधले
’विविध भागांत भूमिगत गटारांची कामे केली
’पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून काळजी घेतली
’जंतुनाशक धूर फवारणी सातत्याने केली
’मुख्य चौकात हायमास्ट उभारले
’पदपथांवरील दिव्यांची यंत्रणा प्रभावी केली
’महापौर क्रीडा स्पर्धा घेतल्या.
’विविध क्षेत्रांतील गुणीजनांचे महापौर पुरस्कार देऊन सन्मान
’प्रभागांमध्ये नाना-नानी पार्क
’चौकांचे सुशोभीकरण, पुतळे उभारले
’आचार्य अत्रे वाचनालय सुविधा नसताना घाईने खुले
’कल्याण स्पोर्ट्स क्लबमधील तरणतलाव खुला केला
’विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप केले

’२००० च्या पालिका निवडणुकीत शिवसेना नेत्यांनी जनतेला वचननाम्यातून ४५ आश्वासने दिली होती. त्यामधील गेल्या पंधरा वर्षांत २७ आश्वासने पूर्ण करण्यात आली.
’२००५ च्या पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने जनतेला २५ आश्वासने दिली होती. त्यापैकी गेल्या दहा वर्षांत फक्त १७ आश्वासने पूर्ण.
काय रखडले?
’ भाषाप्रभू पु. भा. भावे यांचे स्मारक
’ मत्स्यालय, तारांगण, आर्ट गॅलरी
’ २४ तास पुरेशा दाबाने पाणी
’ काळू, उल्हासनदीवर बंधारे बांधणे
’ पालिका रुग्णालयांना शासकीय दर्जा मिळवून देणे
’ फेरीवाल्यांना हटवून पदपथ मोकळे करणे
’ शहरे कचरामुक्त, प्रदूषणमुक्त करणे
’ शहरी गरिबांना घरे देण्यासाठी विशेष महामंडळ स्थापन करणे
कल्याण ठाणे रेल्वे समांतर रस्ता
’ गोविंदवाडी वळण रस्ता
’ बहुमजली वाहनतळे
’ ज्येष्ठ नागरिक भवन