‘पालक’ म्हणवणाऱ्यांनीच परिसराची दुर्दशा केल्याची टीका

मुंबई, ठाण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये युती व्हावी यासाठी शिवसेना-भाजपचे वरिष्ठ नेते ‘सकारात्मक’ चर्चेत गुंतले असताना ठाण्यात मात्र भाजपने शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढायची तयारी सुरू केल्याचे चित्र दिसू लागले आहे. दिव्याचे नियोजन शिवसेनेमुळे बिघडल्याचा आरोप करत बुधवारी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यावरच अप्रत्यक्षपणे टीकेची तोफ डागली. ‘जिल्ह्य़ाचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्यांनीच दिव्याकडे दुर्लक्ष केले. विकासकामांच्या नावाखाली केवळ निधी लाटायचे काम केले, असा आरोप केळकर यांनी केला.

शिवसेनेच्या तुलनेत संघटनात्मक पातळीवर फारच कच्च्या असलेल्या भाजपमधील एका मोठय़ा गटाला यंदा ठाणे महापालिका निवडणुकीत युती नको आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी ठाण्यात आलेल्या नेत्यांपुढे स्थानिक नेत्यांनी एकला चलो रेची हाक दिली. एकीकडे स्थानिक नेते युती नको या मताचे असले तरी ठाण्याबाहेरील नेते मात्र पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यासोबत खासगीत गुफ्तगू करत असल्याची चर्चा रंगली आहे. िशदे आणि भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे हे दोन नेते खासगीत युतीविषयी सकारात्मक असल्याचे भाजपमधील एका गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे दुसरा गट युतीच्या चर्चेत मिठाचा खडा कसे पडेल याची पद्धतशीरपणे आखणी करत असून बुधवारी दिव्यात आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेवर थेट टीकेचे प्रहार करत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला.

ठाणे महापालिका हद्दीचा भाग असूनही दिवा शहर हे सोयीसुविधांपासून वंचित राहिले आहे. विकासकामांच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाने केवळ निधी लाटायचे काम केले आहे. नियोजनाअभावी दिव्याचे कसे तीनतेरा वाजले आहेत याची सविस्तर माहिती संकलित करणाऱ्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केळकरांनी शिवसेनेविरोधात टोलेबाजी करत दिव्याच्या समस्या या पालकत्व फसल्याचे लक्षण असल्याची बोचरी टीका केली. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी दिवा शहरात शिवसेना व भाजपाने एकत्रित लढू नये, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगितले.

चित्रफितीत वाभाडे

दिवा शहराला निधीच दिला जात नाही अशी ओरड सत्ताधाऱ्यांकडून केली जाते, मात्र हे सत्ताधारीच भ्रष्टाचारी आहेत. दिवा शहरातील रस्ते, स्मशानभूमी या कामांसाठी लाखोचे निधी पालिका प्रशासनाने मंजूर केले. परंतु त्यातील निम्माही निधी या कामांसाठी खर्च केला गेला नाही. हा निधी गेला कुठे? कोणती विकासकामे आत्तापर्यंत पालिका प्रशासनाने या भागात केली आहेत याविषयी वाभाडे या चित्रफितीत काढण्यात आले आहते. येथील नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, कचराभूमी, उघडय़ावरील गटारे या समस्यांचा सामना करावा लागतो त्याविषयीचे चित्रण आम्ही माहितीपटाद्वारे दाखविले असल्याचे आदेश भगत यांनी सांगितले. दिव्यात सत्ताधाऱ्यांची पोलखोल सुरूच ठेवणार असल्याचे भाजपचे सरचिटणीस रोहिदास मुंढे यांनी सांगितले.