16 January 2021

News Flash

रेल्वेचे स्तनपान कक्ष अडगळीत

कल्याणमधील घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

(संग्रहित छायाचित्र

कल्याणमधील घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकात स्तनपान करत असलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याच्या घटनेनंतर स्तनदा माताही सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बाळाला स्तनपान करू देण्यासाठी रेल्वेने विविध स्थानकांवरील प्रतीक्षालयांमध्ये स्तनपान कक्ष उभे केले. मात्र याबाबत प्रवाशांना पुरेशी माहिती न देण्यात आल्याने लेकुरवाळय़ा महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जन्मापासून सहा महिन्यांपर्यंत आईच्या दुधाशिवाय अन्य कोणतेही अन्न घटक देऊ नयेत असे डॉक्टर सांगतात. शासनाचा आरोग्य विभागही याविषयी वारंवार जनजागृती करीत असतो. मुलांसाठी दोन वर्षांपर्यंत आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असते. हीच गरज ओळखून एस.टी.च्या प्रत्येक आगारात हिरकणी कक्षसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सामान्य महिलांसाठी असलेली ही सोय कोणत्याही रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर मात्र दिसत नसल्याच्या तक्रारी महिला वर्गाकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासन मात्र फलाटांवर स्ननपान कक्ष असल्याचा दावा करीत आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी याविषयी लोकसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नामध्ये रेल्वेने मध्य रेल्वेच्या  ३३ स्थानकांत आणि पश्चिम रेल्वेच्या २४ स्थानकांत अशी सुविधा असल्याचा दावा केला आहे. मात्र हे स्तनपान कक्ष प्रतीक्षागृहात असून मध्य रेल्वेचे अनेक प्रतीक्षागृह आडवाटेला असल्याने त्याचा लाभ घेणे शक्य होत नाही. त्यामुळे  ही सुविधा प्रत्येक फलाटावर असणे गरजेचे आहे. प्रवासी संघटनांनी या मागणीचा जोर धरला आहे.

रेल्वे फलाटांवर कुठे काय आहे, हे प्रवाशांना माहिती नसते. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू असते. त्यात नाहक वेळ आणि श्रम वाया जातात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्वच्छतागृह, प्रतीक्षालय, स्टेशन प्रबंधक कार्यालय आदी माहितीचे दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे. महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्रतीक्षालयांमध्ये लेकुरवाळ्या मातांसाठी विशेष आसन व्यवस्था रेल्वे प्रशासनाने द्यावी, जेणेकरून मातांची होणारी कुचंबणा थांबू शकेल.

लता अरगडे, तेजस्विनी उपनगरीय महिला प्रवासी संघटना

रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय तयार करण्यात आले आहे. त्यापैकी काही स्थानकांमध्ये स्तनपान करण्यासाठी विशेष कक्षही रेल्वेने उपलब्ध करून दिले आहेत. स्तनदा मातांनी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्रतीक्षालयाचा वापर करावा. जेणेकरून त्यांना सुरक्षित वातावरणात स्तनपान करता येऊ शकेल.

अनिल जैन, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 3:47 am

Web Title: breastfeeding in public places not safe
Next Stories
1 जुन्याच ठिकाणी नव्या ‘नावाने’ वृक्षारोपण
2 पालघरमध्ये पोलीस, दरोडेखोरांमध्ये चकमक
3 ‘प्लास्टिक बंदी’ची जय्यत तयारी
Just Now!
X