News Flash

बीएसयूपी प्रकल्पाला घरघर!

बदलापूर पालिकेचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बीएसयूपी प्रकल्पाला सध्या घरघर लागली आहे.

| February 24, 2015 12:36 pm

बदलापूर पालिकेचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बीएसयूपी प्रकल्पाला सध्या घरघर लागली आहे. बोगस लाभार्थी, या संपूर्ण प्रकल्पाला विविध तक्रारींवरून येणारी स्थगिती, स्थानिक झोपडपट्टी माफियांकडून होणारी गरिबांची फसवणूक, प्रकल्पाचा निधी, ज्यांची घरे तोडली आहेत, त्यांना लोकार्पण होण्याआधी राहायला दिलेली घरे (ट्रान्झिट कॅम्प), संपूर्ण प्रकल्प पूर्ण न झाल्याने राहायला गेलेल्यांची होणारी गैरसोय, लोकप्रतिनिधींची अनास्था, अशा एक ना अनेक समस्या या संपूर्ण प्रकल्पाच्या मागे लागल्या आहेत. त्यामुळे कोटय़वधींचा हा प्रकल्प सुरू कधी होणार, यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बदलापूर शहराच्या मंजूर विकास आराखडय़ानुसार शहरातले सध्याचे छोटे रस्ते हे ६० ते १०० फुटांपर्यंत रुंद होणार आहेत. मात्र सध्या या रस्त्यांवर पूर्वीपासून अनधिकृत घरे असल्याने ती तोडून येथील नागरिकांच्या कायम निवाऱ्यासाठी हा बीएसयूपी प्रकल्प बांधण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील संभाजीनगर, रामनगर, मोहनानंद नगर, मांजर्ली आणि खरवई रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे तोडली असून गांधी टेकडी, गांधी चौक ते होप इंडिया व येथून ज्युवेली रस्ता येथील बांधकामे तोडण्यात येणार आहेत. २०११मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे आतापर्यंत जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजनेंतर्गत तीन टप्पे मंजूर झाले आहेत. ७७ कोटींच्या पहिल्या टप्प्यात १६३४ घरे असून संभाजीनगर, गणेशवाडी, सोनिवली परिसरात हा प्रकल्प आहे.
खरवई येथे होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात १६२४ घरे असून त्याला ६० कोटी रुपये खर्च होणार आहेत. १२८० घरांचे तिसऱ्या टप्प्याचे काम बेलवली येथे सुरू झालेले आहे. यातील संभाजीनगर येथील टप्प्यात ३०० घरांचे बांधकाम झाले असून सोनिवली येथे ६०० घरे तयार आहेत. मात्र संभाजीनगर येथील घरांमध्ये स्थानिक झोपडीमाफियांच्या फसवणुकीमुळे ३७ कुटुंबे अनधिकृतरीत्या राहत असून त्यांच्याकडून झोपडीमाफियाने प्रत्येकी दोन हजार रुपये वसूल केले असल्याची माहिती मिळत आहे.
सोनिवली येथे असलेल्या ६०० घरांमध्येसुद्धा अनधिकृतरीत्या रहिवासी घुसले असल्याचेही समजते आहे. या सर्वाना नोटीस बजावण्यात येणार असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अभियंत्याने सांगितले. तसेच येथील उर्वरित घरांमध्ये ज्यांची शहरातील अनधिकृत घरे तोडण्यात आली आहेत, त्यांना तात्पुरता निवारा म्हणून राहण्यास देण्यात आली आहेत. कारण या प्रकल्पाचे लोकार्पण झालेले नाही. या इमारतींचे काम पूर्ण झाले असले तरी त्या संपूर्ण सुखसोयी व संसाधनांनी सज्ज झालेल्या नाहीत. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना निवारा मिळाला असला तरी सोयी मिळालेल्या नाहीत.
चार हजारपेक्षा जास्त घरे बांधण्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अनेक समस्यांनी ग्रहण लावल्याने केवळ ९०० घरेच बांधून झाली आहेत. त्यामुळे आता हा बी.एस.यू.पी. प्रकल्प सुरू कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा येथील निर्वासित करत आहेत.
संकेत सबनीस, बदलापूर

अनधिकृत बांधकामे तोडण्याचा पेच
या बीएसयूपी प्रकल्पावर यापूर्वीचे खासदार सुरेश टावरे यांनी स्थानिकांच्या निवाऱ्याच्या प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करत स्थगिती आणली होती. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरूनदेखील या प्रकल्पाची कामकाजाबाबत चौकशी झाली होती. अशा तक्रारी या प्रकल्पाबाबत सध्या वारंवार होत आहेत. तसेच सध्या झोपडपट्टी माफिया हे अनधिकृत घरातील कुटुंबाची माथी भडकवत असल्याचे कळत आहे. त्यामुळे येथील नागरिक त्यांची घरे तोडण्यास नकार देत असून स्थानिक लोकप्रतिनिधींची या माफियांना फूस असल्याची चर्चासुद्धा चालू आहे. यामुळे पालिकेसमोर अनधिकृत बांधकामे तोडण्याचा पेच उभा राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 12:36 pm

Web Title: bsup project of badlapur corporation face many problems
Next Stories
1 ख्रिस्ती समाजाचा पालिकेवर मोर्चा
2 कल्याण-डोंबिवली पालिकेची महासभा तीन तास तहकूब
3 कल्याणमधील रस्त्यांवर बेकायदा बांधकामांचे अतिक्रमण
Just Now!
X