आयुक्तांनी दंड भरण्याची सर्वपक्षीय मागणी

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार : वसई- विरार महानगरपालिकेचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करताना पालिका आयुक्त गंगाथरण डी. यांनी मुखपट्टी न वापरल्याने हे अर्थसंकल्प सादरीकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यामुळे आयुक्तांनी स्वत: दंड भरून त्याची पावती समाजमाध्यमांवर प्रसारित करावी, अशी मागणी सर्व पक्ष करत आहेत.

वसई- विरार महापालिकेचा या वर्षीचा आर्थिक संकल्प  ३ मार्च रोजी सादर झाला. सध्या वसईत प्रशासकीय कारभार सुरू  असल्याने प्रशासनाने सदराचा अर्थसंकल्प आयुक्तांना सादर केला, यावेळी पालिका आयुक्त गंगाथरण डी. यांनी करोना या महासाथीच्या पाश्र्वभूमीवर शहरात लागू केलेल्या नियमांचे स्वत: पालन न केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे त्यांनी दंड भरावा अशी मागणी भाजप, रिपाइं, मनसे, जनता दल आणि इतर राजकीय पक्षांनी केली आहे. तर रिपाइंने चक्क भीक मागून आयुक्तांचा दंड भरण्याचा इशारा दिला आहे.

सध्या शहरात करोना महासाथीचा प्रादुर्भाव असताना महानगरपालिकेने शहरात मुखपट्टी वापरणे बंधनकारक केले आहे. मुखपट्टी न वापरण्यावर २०० रुपये दंडाची कारवाई केली जात आहे. यासाठी पालिकेने स्वच्छता मार्शल आणि पोलिसांवर भिस्त आहे. यानुसार पोलीस आणि महापालिकेने हजारो नागरिकांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसुली कार्यक्रम चालविला आहे. असे असतानाही आयुक्त स्वत:च नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोड यांनी केला आहे.