ओढ मातीची : श्वेता साळुंखे

विरारजवळील बोळिंजचा जितेंद्र नाईक आणि वटारची समीक्षा. दोघेही मध्यमवर्गीय घरात जन्माला आले. समीक्षाची शाळा नंदखाल हायस्कूल, तर जितेंद्रची शाळा के. जी. हायस्कूल. दोघांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट जोसेफ महाविद्यालयात झाले. कला शाखेच्या पदवीधर असलेल्या जितेंद्रने मुंबईच्या ‘लोटस हॉटेल’मधून आदरातिथ्य क्षेत्राची (हॉस्पिटॅलिटी) पदवी घेतली. २०११मध्ये त्याने कॅनडा येथे ‘रिव्हेरा रिटायरमेंट होम’मध्ये शेफची नोकरी स्वीकारली. समीक्षाशी त्याचा २०१४ मध्ये विवाह झाला आणि २०१५ मध्ये समीक्षासुद्धा कॅनडाला राहायला गेली. कॅनडातल्या एडमाँटन शहरात दोघांचा संसार सुरू झाला.

जितेंद्र कामाला गेलेला असायचा. समीक्षाला नोकरी लागण्यासाठी महिनाभराचा अवकाश होता. भारतात एकत्र कुटुंबात राहिलेल्या समीक्षाला तिथे एकटेपणा वाटायचा. पण हळूहळू ती जितेंद्रप्रमाणेच तिथे रुळली. पण आजूबाजूच्या घरांतून आपल्या घरात येणारे-जाणारे शेजारी नाहीत, फक्त ‘हॅलो’वर संवाद संपतात. वसईतल्या समाजप्रिय घरातून आलेल्या या दोघांना तिथला शांतपणा पचनी पाडून घ्यावा लागला.

कॅनडाला स्वत:ची अशी विशिष्ट संस्कृती नाही. कारण तिथे मूळचे नागरिकच कमी आहेत. जगभरातून आलेले स्थलांतरित लोक तिथे एकत्र आले आहेत. त्या सगळ्यांची मिळून एक वेगळीच मिश्र संस्कृती तिथे निर्माण झालेली आहे. तिथे एका भागाला तर चक्क ‘मिनी पंजाब’ असे म्हटले जाते. तिथे शीख आणि खलिस्तानी लोकांसाठी वेगवेगळे गुरूद्वारा आहेत. चर्चची संख्या बरीच आहे. पण गंमत म्हणजे प्रत्येक चर्चची रचना त्या त्या देशाप्रमाणे वेगवेगळी आहेत. कॅनडामध्ये जुलै महिन्यात ‘हेरिटेज डे’ साजरा केला जातो. त्यावेळी तिथे अनेक देशांचे प्रतिनिधी गोळा होतात. जगभरातल्या संस्कृती आणि पाककौशल्याचे नमुने सादर केले जातात. अशा वेळी तिथल्या स्थलांतरित नागरिकांमध्ये वेगळाच उत्साह संचारलेला असतो.

अशा रंगीबेरंगी देशात राहताना, भारतातल्या कोणत्या गोष्टींसाठी चुकल्याचुकल्यासारखे वाटते, असे विचारल्यावर समीक्षा उत्स्फूर्तपणे सांगते, ‘स्कुटी चालवणे फार आठवते मला. भारतात राहात असताना, कुठे जायचे असेल तर सगळे कुटुंब कारमध्ये आणि मी स्कुटीवर. पण इथे मात्र कारच चालवावी लागते. दुसरे म्हणजे आपल्याकडे जसे रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ असतात. जसे चाट, वडापाव आणि पाणीपुरी. ते इथेही मिळते, पण त्याला आपल्याकडची चमचमीत चव नसते.’ तिथे घरकाम करण्यासाठी मदतनीस मिळत नाहीत. मिळाले तरी दर फारच जास्त असतात. त्यामुळे घरातली सगळी कामे ते दोघे मिळून करतात. अर्थात, घरोघरी असेच चित्र दिसते. इतकेच काय, तिथे तर अगदी बाळंतपणातही आपल्या भारतासारखे कोडकौतुक होत नाही.

विहानाचा जन्म तिथला असला तरीही तिचे बारसे अगदी आपल्या वसईच्या पारंपरिक पद्धतीने झालेले आहे. तिच्या जन्मानंतर त्यांना पूजा घालायची होती. त्यासाठी पंडितांची वेळ दोन महिने आधीच घ्यावी लागली. त्यातही तिथे मराठी गुरुजी नसतात. हिंदी किंवा तमिळ बोलणारे पंडित असतात. ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये पूजा सांगतात. त्यात काही वेगळं वाटत नाही का, असे विचारल्यावर दोघांचे उत्तर असे की, ‘जे आहे त्यात समाधान मानून घ्यावेच लागते. तिथे स्थलांतरित झालेल्या लोकांनी असेच स्वत:ला तिथल्या साच्यात बसवून आपल्या सर्व चालीरीती पाळायची सवय लावून घेतली आहे.’

विहानाला घेऊन वारंवार भारतवारी करावी, असे दोघांनाही फार वाटते. पण नोकरी सांभाळून ते सदैव शक्य होणार नाही. आपल्या मायदेशात, मायेच्या माणसांत मुलीचे मन रमावे यासाठी ते तिला आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात ठेवतात. दोन्हीकडचे आजी-आजोबा अधूनमधून कॅनडात जातात. घरात ते विहानाशी आवर्जून मराठीत बोलतात. घरात पूर्णपणे सामवेदी पदार्थच बनवतात. वसईतील संस्कृती जपण्याचा पूर्ण प्रयत्न ते करतात.

कॅनडात त्यांच्या भागात पाच मंदिरे आहेत. तिथे गेलेल्या काही मराठी माणसांनी ‘मराठी भाषक मंडळ’ स्थापन केले आहे. सर्वजण एकत्र येऊन आपले सण साजरे करतात. फक्त ते सण आपल्या तिथीप्रमाणे न होता, त्या दरम्यान येणाऱ्या शनिवारी व रविवारी साजरे होतात, पण होतात मात्र अगदी जल्लोषात! पारंपरिक मराठमोळ्या वेशात, लेझीम खेळत मिरवणुकाही काढल्या जातात. कधीतरी मंडळाचे लोक मराठी नाटक किंवा रामलीला सादर करतात. आपल्या भारतातून सिने-नाटय़ कलावंत तिथे नाटक किंवा गाण्यांचे कार्यक्रम करण्यासाठी जातात. त्या त्या वेळेपुरती ही सर्व मंडळी जणू काही भारतातच असतात. जितेंद्र आणि समीक्षा अशा सर्व कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात.

मुलगी विहानाचा जन्मच तिथला. ती मोठी होईल, शिकेल, सावरेल कॅनडातच. मग कदाचित ती भारतात परत यायला नकार देईल का? यावर जितेंद्र-समीक्षाची प्रतिक्रिया फार वेगळी आहे. ते म्हणतात, आता आमचे आई-बाबा आमच्यापासून दूर राहतातच ना? तसेच आम्हीही आमच्या मुलीपासून दूर राहू, पण मायदेशी नक्कीच परत येऊ. समीक्षा भावनाशील आहे. ती सांगते, ‘सुख असो की दु:ख, ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला आपली मायबोली जवळची वाटते. इथे भारतीय आहेत, पण ते आपली भाषा बोलणारे नाहीत. म्हणून मला आपल्या लोकांत परत यायचे आहे.’

आपले आयुष्य घडवण्यासाठी परदेशात गेलेल्या मराठमोळ्या जितेंद्र-समीक्षाचे भारतावर किंबहुना वसईतल्या परिसरावर किती प्रेम आहे हे त्यांच्याशी बोलून प्रकर्षांने जाणवते आणि नव्या पिढीची ही आपल्या मातीची ओढ पाहून मन सुखावून जाते.