शहाड-आंबिवलीदरम्यानच्या घटनेनंतर लोकल वेळापत्रक कोलमडले

ठाणे : मध्य रेल्वेच्या मार्गावरील शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या रेल्वे फाटकाला एका डम्परने शुक्रवारी पहाटे धडक दिली. या अपघातात ओव्हरहेड वायर तुटल्याने या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. ऐन सकाळी गर्दीच्या वेळेत या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असली तरी अपघातामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने ३० ते ३५ मिनिटे उशिराने लोकल वाहतूक सुरू होती. त्याचा फटका कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसून त्यांचे हाल झाले. या अपघातप्रकरणी डम्परचालकास टिटवाळा रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे.

डम्परवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो फाटकावर जाऊन आदळला. त्या धक्क्याने फाटकाचा काही भाग ओव्हरहेड वायरवर पडला आणि ती तार तुटली. त्यामुळे कल्याण ते कसारादरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली. ओव्हडहेड वायर दुरुस्तीच्या कामासाठी एक तासांचा अवधी लागला आणि त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. असे असले तरी या अपघातामुळे ऐन सकाळच्या वेळेत लोकलगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. सुमारे ३० ते ३५ मिनिटे उशिराने लोकल वाहतूक सुरू होती. त्यामुळे आसनगाव, खडवली, अंबिवली, शहाड, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि ठाणे स्थानकांवर सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची गर्दी वाढली होती. या अपघातामुळे नंदीग्राम, विदर्भ, देवगिरी, गोरखपूर आणि नागपूर दुरांतो या एक्स्प्रेस गाडय़ांचीही वाहतूक बंद पडली होती. या अपघाताप्रकरणी टिटवाळा रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्य़ात डम्परचालकास अटक केली आहे. तसेच त्याचा डम्परही जप्त केला आहे.

गर्दीमुळे लोकलमधून पडून तरुण जखमी

दिवा परिसरात राहणारे राजेश शर्मा (३१) हे भिवंडीतील मानकोली परिसरात काम करतात. या कामावर जाण्यासाठी ते दिवा रेल्वे स्थानकातून ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करतात आणि त्यानंतर बसने मानकोलीपर्यंत प्रवास करतात. शुक्रवारी त्यांनी ठाणे स्थानकात जाण्यासाठी दिवा स्थानकातून लोकल पकडली. मात्र, प्रचंड गर्दी असल्याने त्यांना लोकल गाडीच्या आतमध्ये शिरता आले नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाजातच उभा राहून ते प्रवास करीत होते. त्यावेळेस दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून त्यांच्या छातीला, कानाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रेल्वे पोलिसांनी तात्काळ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिथे त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.