भाईंदर पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या पादचारी मार्गाची व्यथा

भाईंदर : भाईंदर पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या पादचारी भुयारी मार्गात पाणी साचल्याने नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालिकेने पन्नास लाख रुपये खर्च करूनही भुयारी मार्गातील गळती थांबलेली नाही.

भाईंदर पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठय़ा संख्येने लोकवस्ती आहे. तसेच वेगवेगळ्या औद्योगिक वसाहती असल्यामुळे अनेक नागरिक निरनिराळ्या कामानिमित्त भाईंदर पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पादचारी भुयारी मार्गाचा वापर करत असतात. परंतु गेल्या दोन दिवसांपासून या भुयारी मार्गात पाणी साठले आहे. विशेष म्हणजे पाऊस नसतानाही पाणी पाणी साचत आहे.

या पादचारी भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठी पालिकेने पन्नास लाखांहून अधिक खर्च केला आहे. मात्र पाणी साचण्याची समस्या दूर झालेली नाही. भुयारी मार्गावरची गळती कायमची दूर व्हावी म्हणून विद्यमान महापौर यांनी रेल्वे प्रशासनाला  पत्रव्यवहार केला होता. रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्यामुळे नागरिकांना आता आरोग्याच्या समस्यादेखील उद्भवू लागल्या आहेत.

भुयारी मार्गातील विद्युत पंप बंद असल्यामुळे पाणी साचले आहे. परंतु त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

– अरविंद पाटील, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग