रॉक बॅण्ड आणि फ्युजनच्या या जगतात आजही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला उच्चतम स्थान आहे. कल्याणमधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या देवगंधर्व महोत्सवाने दर वर्षीप्रमाणे यंदाही याचा प्रत्यय दिला. कल्याणमधील गायन समाजातर्फे भरविण्यात येणाऱ्या देवगंधर्व महोत्सवाचे यंदाचे चौदावे वर्ष होते. आत्तापर्यंत या महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया, रोणू मजुमदार, गायिका शुभा मुद्गल, पद्मविभूषण अमजद अली खान, पद्मभूषण जगजित सिंह, पं. संजीव अभ्यंकर, उस्ताद झाकीर हुसेन, पं. विश्वमोहन भट, उस्ताद रशीद खान, नृत्यांगना कनक रेळे, आदिती भागवत, सोनिया परचुरे, अर्चना जोगळेकर, झेलम परांजपे अशा विविध मान्यवरांनी आपली कला सादर केली आहे. यंदाच्या वर्षी या महोत्सवात सतारवादक पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ, संगीत मरतड पं. जसराज आणि शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली आदी मान्यवरांनी आपली कला सादर करीत कल्याण शहर संगीतमय केले. डॉ. एन्. राजम्, संगीता शंकर आणि रागिणी शंकर यांच्या व्हायोलिनवादनामुळे महोत्सवाला अधिक बहर आली.