मानसी जोशी

मागणी वाढल्यामुळे मॉलपाठोपाठ बाजारपेठांमध्येही ‘प्लस साइज’ दुकाने

सर्वसाधारण बांधा असलेल्या व्यक्तींसाठी बाजारपेठांमध्ये कपडय़ांची हवी तितकी दुकाने उपलब्ध असली तरी स्थूल व्यक्तींसाठी मात्र कपडे खरेदी करणे ही नेहमीच चिंतेची बाब ठरते. खास अशा व्यक्तींसाठी मॉलमध्ये ‘प्लस साइज’ दुकाने उपलब्ध असली तरी त्यांचे प्रमाण कमी आहे आणि तेथील कपडय़ांच्या किमतीही जास्त असतात. परंतु आता ठाण्यातील रस्त्यांलगतच्या बाजारपेठेतही ‘प्लस साइज’ दुकानांची संख्या वाढू लागली आहे. या दुकानांमध्ये विद्यमान फॅशननुसार स्थूल व्यक्तींच्या मापांचे कपडे उपलब्ध होत आहेत.

भारतात एकूण लोकसंख्येपैकी तीस कोटी नागरिक  लठ्ठ असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार लठ्ठपणा वाढत असल्याचे आरोग्य अभ्यासकांकडून सांगण्यात येते. लठ्ठ व्यक्तीला अपेक्षित अधिक मापाची कपडे सहजर उपलब्ध होत नाहीत. स्थूल व्यक्तींच्या कपडय़ांच्या मागणीचा वाढता आलेख पाहून काही वर्षांपासून फॅशन डिझायनर्सनी ‘प्लस साइज’ कपडय़ांची निर्मिती सुरू केली आहे. फॅशन शोमध्ये स्थूल मॉडेलसह या कपडय़ांचे प्रदर्शनही केले जाते. अशा कपडय़ांची दुकाने मोठमोठय़ा मॉलमध्ये सुरू झाली असून तेथे येणाऱ्या ग्राहकांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र आता सर्वसामान्य बाजारपेठांतही अशी दुकाने थाटण्यात येऊ लागली आहेत. या दुकानांमध्ये दैनंदिन वापरासोबत लग्न समारंभ, पार्टी आणि फॉर्मल्स असे विविध प्रकार पाहायला मिळत आहेत.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात प्लस साइजच्या कपडय़ांची विक्री करणारी दहा ते पंधरा दुकाने असल्याचे मोठय़ा मापाच्या कपडय़ाची विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे. या दुकानांमध्ये महिलांसाठी ब्लाऊज, डेनिम, वनपीस, गाऊन, केप्री, कुर्तीज, पलाझो आणि स्कर्ट हे दैनंदिन वापरातील मोठय़ा मापाचे कपडेदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तरुणांसाठी पँट, शॉर्ट आणि शर्टसुद्धा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. या मोठय़ा मापातील कपडय़ांची मागणी वाढली असून साधारणत: आठशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत गुणवत्तेनुसार या कपडय़ांची विक्री होत आहे. या कपडय़ांमध्ये वन पीस, कुर्ती आणि जीन्सवर घालायचे टॉप या कपडय़ांना स्थूल ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले. लाल, काळा आणि पिवळा या रंगांची मोठय़ा मापातील कपडे खरेदी करण्यास ग्राहक  अधिक पसंती दर्शवत आहेत, असे कपडे विक्रेत्यांनी सांगितले. फ्लोरल, चेक्स आणि प्रिंटेड प्रकारदेखील पाहायला मिळतात. तसेच ऋतूनुसार निरनिराळ्या प्रकारचे मोठय़ा मापातील कपडे दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

ऑनलाइन मागणी

कपडय़ांची ऑनलाइन विक्री होणाऱ्या संकेतस्थळांवरही मोठय़ा मापाच्या कपडय़ांना अधिक मागणी आहे. बाजारपेठेच्या तुलनेत या संकेतस्थळांवर मोठय़ा मापाची अंतर्वस्त्रे उपलब्ध असल्याने ग्राहकांची ही अंतर्वस्त्रे खरेदी करण्यासाठी जास्त मागणी असल्याचे संकेतस्थळाच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.

मोठय़ा मापाचे कपडे स्थूल व्यक्तींच्या शरीराला अनुसरून तयार करण्यात येतात. दिवसेंदिवस मोठय़ा आकाराचे कपडे मिळणाऱ्या दुकानांमध्ये नागरिक गर्दी करू लागले आहेत. पुढील काळात विविध नक्षीकाम करण्यात आलेले मोठय़ा आकाराचे कपडे बाजारात आणण्याचा मानस आहे.

-नेहा खटाल, विवा फॅशन स्टोअर