मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी; कामे विनाविलंब सुरू करण्याचे ‘एमएमआरडीए’ला आदेश

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रहिवाशांना चांगले रस्ते, वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि मनोरंजन, पर्यटन स्थळाची साधने उपलब्ध व्हावीत या विचारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषाधिकारातून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील विकास कामांसाठी सुमारे ८० कोटीची विकास कामे तात्काळ मंजूर केली. ही कामे विनाविलंब सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग, ‘एमएमआरडीए’ला दिले आहेत.

कल्याण-डोंबिवली पालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पालिका हद्दीतील रखडलेली विकास कामे, शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे बेजार झालेले नोकरदार, चाकरमानी यांची व्यथा, शहरात मनोरंजनाची साधने नसल्याने  रहिवाशांची होणारी कुचंबणा याविषयी चर्चा केली. खाडी किनारा असूनही तो ओसाड आहे. याच ठिकाणी पर्यटन स्थळ विकासाची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक कामांना मंजुरी देऊन ती विनाविलंब मार्गी लावण्याचे आदेश नगरविकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ‘एमएमआरडीए’चे आयुक्त आर. ए. राजीव यांना दिले आहेत.

याशिवाय, महापालिकेचे स्थानिक संस्था कर रद्द झाल्याने शासनाकडून मिळणारे मागील आर्थिक वर्षांचे २२ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान तात्काळ पालिकेला वितरित करण्याचे आदेश नगरविकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना दिले. २७ गावे पालिकेत समाविष्ट झाल्यामुळे पालिकेवर आलेला आर्थिक ताण विचारात घेऊन विशेष अनुदान म्हणून साडे पाच कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले. टिटवाळा येथे कर्करुग्ण रुग्णालय, डोंबिवलीतील सूतिकागृहाच्या जागेत महिला, मुलांसाठी रुग्णालय उभारणीसाठी सहकार्य करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

विकासाचे मंजूर प्रस्ताव

* कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथे सकाळ ते रात्री उशिरापर्यंत पलावा चौक वाहतूक कोंडीने गजबलेला असतो. या सततच्या कोंडीमुळे नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबईत जाणारा नोकरदार, उद्योजक हैराण झाला आहे. हा विचार करून पलावा चौकात भुयारी मार्ग बांधण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली. ‘एमएमआरडीए’चे आयुक्त आर. ए. राजीव यांना या भुयारी मार्गासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. विनाविलंब हे काम पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.

* मुंबईतील नेहरू तारांगणाच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीत अद्ययावत तारांगण उभारावे ही मागणी मान्य करून मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी पाच कोटी मंजूर केले. हा निधी तात्काळ पालिकेला उपलब्ध करून देण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले आहेत. कल्याणमधील उंबर्डे येथे तारांगणासाठी आठ वर्षांपूर्वी जागा निश्चित करण्यात आली आहे.

* पालिका हद्दीत सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून सीमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांचा शासनाकडे शिल्लक असलेल्या निधीतून या रस्त्यांलगतच्या पोहच रस्त्यांची कामे सीमेंटची करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना दिले.

* २७ गावांमधील पालिकेचे आरक्षित भूखंडांचे, विकास आराखडय़ातील रस्त्यांचे सीमांकन आणि गटारे बांधणीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांना दिले.

* कडोंमपा हद्दीत केंद्र, राज्य शासनाच्या अनेक योजनांतर्गत विकास कामे सुरू आहेत. या कामांमधील शासन हिश्श्याचा निधी पालिकेला उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

* २७ गावे पालिका हद्दीत समाविष्ट झाल्यामुळे या गावांच्या हद्दीत अधिकाधिक विकास कामे मार्गी लागली पाहिजेत म्हणून वाढीव निधीची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.