कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या निवडीवरून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

कल्याण-डोंबिवलीतील परंपरागत मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डावलून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वतच्या मर्जीतील उमेदवार दिल्याची चर्चा एकीकडे जोर धरु लागली असताना मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी बुधवारी रात्री उशीरा शहरातील काही महत्वाच्या संघ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
निवडणुकीचे पडघम वाजण्यापुर्वी डोंबिवलीत स्मार्ट सिटीच्या सादरीकरणासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी निवडणुकीला कशाप्रकारे समोरे जावे याची चर्चाही करण्यात आली होती. पाच वर्षांपुवी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने रिवद चव्हाण यांनी उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या संघाची मते महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळली होती. यंदा महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात संघाला विश्वासात घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भिवंडीचे खासदार कपिल पाटील आणि डोंबिवलीचे आमदार रिवद चव्हाण यांनी दिलेले उमेदवार संघातील एका मोठय़ा गटाच्या पचनी पडलेले नाहीत, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे संघ आणि भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातही वारे दुसरीकडे वाहत असल्याची भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटू लागली आहे. गेल्या निवडणुकीपमाणे भाजपची परंपरागत मते दुसरीकडे गेल्यास एकहाती सत्ता तर दूरच मात्र शिवसेनेला आव्हान उभी करण्याइतक्या जागाही मिळणार नाहीत, अशी भीती भाजपच्या गोटात व्यक्त होत असताना बुधवारी डोंबिवलीतील सभा आटोपून मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी तातडीने संघाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधल्याचे वृत्त आहे. डोंबिवलीतील बैठकीनंतर जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या जेवणानिमित्त काही मंडळींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत घेतल्याचे भाजपतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने मान्य केले. संघाच्या विचारांच्या वाटेवर नेहमी भाजप चालत आला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी अशा कोणत्याही बैठकीची आवश्यकता नाही, असेही या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरु असल्याने संघाच्या एकाही पदाधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही.

निष्ठा बदलणाऱ्यांनी
राष्ट्रवाद शिकवू नये..

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

प्रतिनिधी, डोंबिवली
विकासाच्या विषयावर एकही शब्द न बोलणारे आता राष्ट्रवादाच्या विषयावर तोफा डागत आहेत. ज्यांची कारकीर्द राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो म्हणून पद मिळवण्यात गेली. ते आमचे मित्र पक्षातील रामदासभाई कदम यांचा पगार किती आणि ते राष्ट्रवादावर बोलतात किती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले निष्ठावान कार्यकर्ते आम्ही आहोत. रोखठोक अग्रलेख लिहिले. एक-दोन कार्यक्रम उधळले म्हणून राष्ट्रवादी होता येत नाही. ज्यांचे जीवन आणि कार्य राष्ट्रवाद होते त्यांच्या मुशीतून आम्ही तयार झालो आहोत. जे संकुचित फायद्यासाठी भूमिका बदलतात, अशांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि अग्रलेखकारांना लगावला. पालिका निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्र्यांची संकल्प सभा डोंबिवलीत आयोजित करण्यात आली होती. रामदास कदम यांनी सभेत मुख्यमंत्र्यांवर थेट टीका करून शहरवासीयांना भूलथापा देणारी आश्वासने देऊ नका, असा इशारा दिला होता. रामदास कदम यांनी राष्ट्रवादीमध्ये जातो म्हणून शिवसेनेत पदे मिळवली. त्यांनी आम्हाला काय निष्ठा शिकवावी.

मित्रपक्षांना फसवणारे
करवीरकरांना फसवतील!

उद्धव यांची भाजपवर टीका

प्रतिनिधी, कोल्हापूर
भाजपने आजवर त्यांच्या अनेक मित्र पक्षांना आश्वासने देत फसवले आहे, ते तुम्हालाही फसवतील, असे करवीरवासीयांना सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेनेने कोल्हापुरातील टोल हटवला तर ज्यांनी टोलचे भूत करवीरवासीयांच्या मानेवर बसवले त्यांच्याबरोबर भाजपने युती केली आहे. एवढी वर्षे कोल्हापूरचे वाटोळे करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला तर मते मागण्याचाही अधिकारच नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, की कोल्हापूरच्या विकासाबाबत आज बोलणारे हे सगळे पक्ष एवढे दिवस कुठे होते. सत्ताधारी पक्षांना या शहरासाठी आजवर काही करता आले नाही. तर भाजपच आज या पक्षांच्याच वळचणीला जाऊन बसला आहे. कोल्हापूरच्या मानेवर बसवलेला टोल शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून रद्द झाला. तो रद्द झाल्यावर त्याचे श्रेय घ्यायला सगळेच जण पुढे येत आहेत.

एक-दोन पराभवाने खचून जाणारा नाही..

राज यांचे एकहाती सत्तेचे आवाहन

प्रतिनिधी, कल्याण<br />निवडणुकांमधील पराभव लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यामुळे एक-दोन पराभवाने खचून जाणारा मी नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन इतका मोठा काळ उलटल्यानंतर आता त्यांच्या भाजप पक्षाला बहुमत मिळत असेल, तर माझ्या पक्षाला मिळालेला काळ खूपच कमी आहे. नाशिक शहरामध्ये सत्ता मिळाल्यानंतर अत्यंत कमी काळात तेथील विकास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्येही एकहाती सत्ता दिल्यास पहिल्या पाच वर्षांमध्येच प्रत्येकाने विचारही केला नसेल, असे शहर घडवण्याचा विश्वास मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केला. नाशिकच्या विकासाचे दृक सादरीकरणही या वेळी करण्यात आले.
कल्याण-डोंबिवलीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बुधवारी कल्याणच्या खडकपाडा चौकामध्ये राज ठाकरे यांनी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती या सभेच्या निमित्ताने दाखवणार असल्याचे मनसेच्या वतीने पूर्वीच जाहीर करण्यात आल्याने या सभेकडे सगळ्यांचेच लक्ष होते.