07 April 2020

News Flash

ठाण्यातील राष्ट्रध्वजाची दुरवस्था

राष्ट्रध्वजासंदर्भात निश्चित केलेल्या आचारसंहितेचा अवमान होत आहे.

(संग्रहित छायाचित्र )

ठाणे : ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्दय़ावरून उठलेले वादळ शमत असतानाच, ठाण्यातील गोल्डन डाइज नाका भागात महापालिकेने उभारलेल्या राष्ट्रध्वजाचा दुरवस्थेमुळे अवमान होत असल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. या कामासाठी नियुक्त कंपनीने जबाबदारी झटकून पालिकेकडे बोट दाखविल्याचा दावा करत त्यांनी राष्ट्रध्वज बदलण्याची मागणी केली आहे.

ठाणे येथील माजिवडा भागातील गोल्डन डाइज नाका परिसरात महापालिकेने तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत शंभर फुटी राष्ट्रध्वज स्तंभ उभारला. या राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचा दावाही पालिकेने केला होता. मात्र आता हा दावा फोल ठरल्याचे समोर आले आहे. या संदर्भात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. राष्ट्रध्वजासंदर्भात निश्चित केलेल्या आचारसंहितेचा अवमान होत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे महापौर म्हस्के यांनी पत्रात म्हटले आहे. राष्ट्रध्वज बदलण्याबाबत संहितेमध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार तातडीने कार्यवाही करावी , अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

गोल्डन डाइज नाका परिसरात उभारलेला शंभर फुटी राष्ट्रध्वज जीर्ण झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर याबाबत चौकशी केली. त्यामध्ये या कामासाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडे निगा व देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र ही जबाबदारी आमची नसून महापालिकेची असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच याबाबत नागरिक महापालिकेला जबाबदार धरत असून हा राष्ट्रध्वज केवळ प्रसिद्धीसाठी उभारला आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 3:44 am

Web Title: code of conduct regarding the national flag is being disrespected in thane zws 70
Next Stories
1 कल्याण ‘आरटीओ’ला स्वतंत्र इमारत
2 वसईचे समाजरंग : आगरी समाजातील विवाह सोहळे
3 वसईत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
Just Now!
X