27 February 2021

News Flash

महाविद्यालयीन महोत्सव बंदिस्त सभागृहांत

नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ महाविद्यालयीन महोत्सवांसाठी प्रचलित मानला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

ऋषीकेश मुळे

ध्वनिप्रदूषणाच्या र्निबधांमुळे खुल्या जागेत मज्जाव

डिसेंबर महिना सुरू होताच महाविद्यालयांमध्ये महोत्सवांची लगबग सुरू होते. मात्र, ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने घातलेल्या र्निबधांमुळे यंदा ठाण्यातील महाविद्यालयांत महोत्सवाची तयारीही शांततेत सुरू आहे. महाविद्यालयांच्या आवारात ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करण्यास मज्जाव करण्यात आल्याने महोत्सवांमध्ये वापरण्यात येणाऱ्या डीजेंवर पूर्णपणे बंदी आल्याचे चित्र आहे. तर, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचा भंग होऊ नये, यासाठी अनेक महाविद्यालयांनी यंदा बंदिस्त सभागृहांत महोत्सवांचे आयोजन केले आहे.

नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ महाविद्यालयीन महोत्सवांसाठी प्रचलित मानला जातो. या काळात महाविद्यालयात आयोजित करण्यात येणारे रोज डे, कपल डे, ट्रॅडिशनल डे सारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांना कमालीचे आकर्षण असते. यामध्ये उत्सवांच्या सांगता कार्यक्रमाला आयोजित करण्यात येणाऱ्या डीजे कार्यक्रमांना विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असते. यंदा मात्र, महोत्सवांतील दणदणाट कमी होण्याची चिन्हे आहेत.

उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत आखून दिलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी मुंबई तसेच आसपासच्या शहरांतील ९६ महाविद्यालय व्यवस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. याचा धसका उरलेल्या महाविद्यालयांनीही घेतला आहे. त्यामुळे यंदा अनेक महाविद्यालयांत बंदिस्त सभागृहांत महोत्सव भरवण्यात आले आहेत.

बा ना बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना डीजेच्या आवाजामुळे होणारा त्रास रोखण्यासाठी यंदाचा आकांक्षा महोत्सव हा महाविद्यालयातील पतंजली सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. तर जोशी बेडेकर महाविद्यालयाचाही नवरंग महोत्सव महाविद्यालयातील कात्यायन सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच उल्हासनगरचे सीएचएम महाविद्यालय ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मोठय़ा आवाजाच्या स्पीकरचा वापर टाळणार असल्याचे सांगितले जात आहे.

कारण काय?

नागरी वसाहतींत ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाची पातळी करण्यास उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. ठाण्यातील अनेक महाविद्यालये लोकवस्तीतच आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांतील महोत्सवाच्या आवाजावर र्निबध आल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांपासून ध्वनिप्रदूषणाचा प्रभाव वाढू लागल्याने आमच्या महाविद्यालयातील पर्यावरण विभागाने आकांक्षा महोत्सवाचा आवाज हा ८५ डेसिबलच्या वर जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या नियमाची आम्ही गेली पाच वर्षे अंमलबजावणी करत आहोत. सर्व विद्यार्थ्यांंनी पुढाकाराने यंदाच्या वर्षी महाविद्यालयाचा आकांक्षा महोत्सव हा पतंजली सभागृहात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

-डॉ. माधुरी पेजावर

प्राचार्या, बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय

गेल्या काही दिवसांपासून शिक्षण संस्थांनी महोत्सवांच्या वेळी होणारे डीजेचे आवाज रोखावे याकरिता मोहीम हाती घेत आहोत. विद्यार्थी देखील या उपक्रमाला साथ देत आहेत. आज विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयांनी त्यांचे महोत्सवही सभागृहात आयोजित करून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

-डॉ. महेश बेडेकरसामाजिक कार्यकर्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 2:25 am

Web Title: college festival closed the hall
Next Stories
1 ठाण्यात अत्याधुनिक सिग्नल
2 पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट
3 ठाणे जिल्ह्य़ातील पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा
Just Now!
X